रायबागमधून प्रदीप माळगी, कुडचीत आनंद माळगींना उमेदवारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीसाठी निधर्मी जनता दलाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी निजद वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी 50 उमेदवारांची नावे जाहीर केली. तीव्र कुतूहल असलेल्या हासन मतदारसंघातून भवानी रेवण्णा यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. अथणीमधून शशिकांत पडसलगी स्वामीजींना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. ते काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्याचप्रमाणे कुडचीमधून आनंद माळगी, रायबागमधून प्रदीप माळगी आणि सौंदत्तीमधून सौरभ चोप्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
निजदने डिसेंबर महिन्यात 93 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर शुक्रवारी 49 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर नजरचुकीने लगेच राहून गेलेल्या शिमोगा जिल्ह्यातील सागर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. एस. एल. घोटणेकर यांना हल्याळमधून तर शिरसीमधून उपेंद्र पै यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यल्लापूरमध्ये डॉ. नागेश नायक यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. गुरुवारी निजदमध्ये दाखल झालेल्या माजी मंत्री वाय. एस. व्ही. दत्ता यांनाही कडूरमधून तिकीट जाहीर करण्यात आले.
देवेगौडांच्या सुनेला हासनमधून तिकीट नाकारले
जोरदार रस्सीखेच असलेल्या हासन मतदारसंघातून भवानी रेवण्णा तिकीट मिळविण्यात अपयशी ठरल्या आहेत. उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वी माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन पत्नी भवानी रेवण्णा यांना हासनमधून तिकीट देण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, त्यांना अपयश आले. तर कुमारस्वामी यांच्या अपेक्षेप्रमाणे एच. पी. स्वरुप यांना तिकीट देण्यात आले. स्वरुप यांना तिकीट जाहीर होताच स्वरुप यांच्या समर्थकांनी मिठाई वाटून जल्लोष केला. स्वरुप हे निजदमधून हासन मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार एच. एस. प्रकाश यांचे पुत्र आहेत.
निजदचे उमेदवार…
रायबाग प्रदीप माळगी
कुडची आनंद माळगी
सौंदत्ती सौरभ चोप्रा
अथणी शशिकांत पडसलगी स्वामीजी
हुबळी धारवाड पू. वीरभद्रप्पा हालहरवी
हल्याळ एस. एल. घोटणेकर
शिरसी उपेंद्र पै
यल्लापूर डॉ. नागेश नायक
कारवार चैत्रा कोटेकर
कुमठा सूरज नायक सोनी
भटकळ नागेंद्र नायक
होळेनरसीपूर एच. डी. रेवण्णा
अरकलगूड ए. मंजू