चेअरमन विठ्ठल हलगेकर यांची घोषणा, यावर्षीच्या गळीत हंगामाची सांगता
वार्ताहर /खानापूर
भाजपचा मी जुना जाणता कार्यकर्ता आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यपद्धतीचा मी साक्षीदार आहे. देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून विकासाची परिभाषा बदललेली आहे. आणि आज देश विकासाकडे वाटचाल करत आहे. राज्यातही सामान्य जनतेच्या हिताच्या योजना सरकारने राबविल्या आहेत. भाजपमध्ये जो पक्षनिष्ठा आणि जनतेची नि:स्वार्थपणे सेवा करतो त्याला भाजप पक्षात निश्चित न्याय मिळतो. आपल्या प्रकृतीची पर्वा न करता खानापूर तालुक्यातील जनतेची अखंडितपणे सेवा करण्याचे काम विठ्ठल हलगेकर हे करत आहेत. याचा मी आणि भाजप पक्षातील नेतेमंडळी साक्षीदार आहेत. त्यामुळे विठ्ठल हलगेकरांकडे नेतृत्व गुणाची चुणुक असून ते नक्की तालुक्याचे भाजपचे नेतृत्व करतील, यात शंका नाही, असे उद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील यांनी लैला शुर्गर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
कारखाना कार्यस्थळावर गळीत हंगामाचा सांगता समारंभ, श्री महालक्ष्मी फार्मर प्रोड्युसर को- ऑप. ऑर्गनायजेशन (नि.) सोसायटीचे उद्घाटन व ऊस उत्पादक शेतकरी मेळावा अशा आयोजित संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठल हलगेकर होते. व्यासपीठावर भाजप नेते किरण यळळूरकर, मारुती पाटील, प्रकाश तिरवीर, मनोहर कदम, यल्लाप्पा तिरवीर, महादेव बांदीवडेकर, चांगाप्पा निलजकर, बाळगौडा पाटील, सुभाष गुळशेट्टी, हणमंत पाटील, महालक्ष्मी मल्टीपर्पजचे जनरल मॅनेजर तुकाराम हुंदरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील आदी उपस्थित होते. खानापूर येथील लैला शुगर्सचा 2022-23 च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ करण्यात आला. यावर्षी 3 लाख 15 हजार टन उसाचे गाळप झाले आहे. यापूर्वी पहिला हप्ता 2600 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आता दुसरा हप्ता 200 रु. देणार आहे. त्यापैकी 150 रु. 15 एप्रिलनंतर व उर्वरित 50 रु. गणेचतुर्थी सणाला देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन विठ्ठल हलगेकर यांनी केली. खानापूर तालुक्यातील 80 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याला ऊस पाठविला आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून उसाचा हप्ता दिला आहे. शेतकऱ्यांचे भूषण म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला एक ड्रेसकोड देण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कारखान्याचा पुढचा हंगामही यशस्वी करुया, असे आवाहन केले. खानापूर तालुक्यातून शेतकरी, भाजप कार्यकर्ते, विठ्ठल हलगेकर यांचे हितचिंतक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश अथणीकर यांनी केले. तर आभार तुकाराम हुंदरे यांनी मानले.









