प्रमुख विधेयके, शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणार चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या उत्तरार्धाला सोमवारी प्रारंभ होणार आहे. यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष सज्ज असून उत्तरार्धात तरी आमदारांची उपस्थिती बऱ्यापैकी असणार का? हे पहावे लागणार आहे. बेळगाववर हक्क सांगण्यासाठी सीमाप्रश्नी केलेला ठराव वगळता पूर्वार्धात ठोस असे कामकाज झालेले नाही.
सोमवारी सकाळी 11 वाजता विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. काही प्रमुख विधेयके दोन दिवसांत पारित करून घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न असणार आहेत. खासकरून नियम 69 अन्वये आरक्षण वाढीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
याबरोबरच विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, निजदचे नेते एच. डी. रेवण्णा आदींनी संपूर्ण राज्यात अतिवृष्टी, अनावृष्टी व बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात आला आहे. यात भर पडावी अशी बनावट बियाणे, बनावट खते, बंदी घातलेली कीटकनाशकांची विक्री, कृषी उत्पन्नांचा दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे ठाकलेले आर्थिक संकट याविषयी नियम 69 अन्वये चर्चेची नोटीस दिली आहे. ही चर्चाही होण्याची शक्यता आहे. आमदार सिद्धू सवदी यांनी अनियमित बससेवेबद्दल 21 रोजी प्रश्न विचारला होता.
प्रश्नोत्तराच्या तासात या मुद्द्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली होती. निजद-काँग्रेसच्या आमदारांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे धरले होते. या मुद्द्यावर संपूर्ण दिवसभर काथ्याकूट झाला. सभाध्यक्षांनी याविषयी अर्धा तास चर्चेला अनुमती दिली असून सोमवारी विषयपत्रिकेनुसार कामकाज झाल्यास याविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध परिसरात खबरदारी घेण्यात येत आहे. नियोजित तारखेपेक्षा संसदेचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस आधी आटोपते घेण्यात आले. आमदारांची अनास्था व कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही अधिवेशन बुधवारपर्यंत गुंडाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









