वृत्तसंस्था / अमृतसर
शीखांचे पवित्र मंदिर असणाऱ्या सुवर्णमंदिर परिसरात 30 तासाच्या आत आणखी एक बाँबस्फोट झाला आहे. हे मंदिर पंजाबमध्ये अमृतसर येथे आहे. रविवारी या मंदिराच्या परिसरातील मार्गावर स्फोट झाला होता. त्यात 3 शाळकरी मुली जखमी झाल्या होत्या. यानंतर सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही तेथे स्फोट करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही स्फोटांचा तपास सुऊ केला आहे.
हे स्फोट कदाचित आर्थिक संघर्षातून करण्यात आलेले असू शकतात. दोन्ही स्फोट कमी तीव्रतेचे होते. त्यामुळे ते कोणत्यातरी मोठ्या संघटनेकडून झालेले असण्याची शक्यता कमी आहे. तथापि, ते दहशतवाद्यांनी घडविल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व शक्यता गृहित धऊन तपास करण्यात येत आहे. सध्या कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. अद्याप, या दोन्ही स्फोटांच्या संदर्भात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती देण्यात आली.
दुसऱ्या स्फोटात 1 जखमी
सोमवारी सकाळी सुवर्ण मंदिर परिसरातील हेरिटेज मार्गावरच दुसरा स्फोट झाला आहे. त्यात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. हा स्फोटही कमी तीव्रतेचा असल्याने मोठी हानी झाली नाही. स्फोटके अत्याधुनिक असल्याचे रविवारी प्रथमदर्शनी तपासानंतर स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, ही स्फोटके स्थानिक साधनसामुग्रीपासूनच तयार करण्यात आलेली होती, हे आता अधिक तपासानंतर स्पष्ट होत आहे. या स्फोटांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने तपासाला निश्चित दिशा मिळालेली नाही. त्यामुळे पुरेसा तपास होऊन निश्चित पुरावे हाती आल्यानंतरच पुढील माहिती देण्यात येईल. सध्या पोलीस दहशतवादाची शक्यताही पडताळून पहात आहेत. सुवर्णमंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आता अधिक वाढविण्यात आली आहे, असेही स्पष्ट केले गेले.









