उद्यमबाग कलमेश्वर हाऊसिंग कॉलनीतील प्रकार : एलअँडटी कारभाराबाबत तीव्र संताप
बेळगाव : एलअँडटीकडून 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी दोन वर्षांपूर्वी उद्यमबाग येथील कलमेश्वर हाऊसिंग कॉलनीत घातलेली जलवाहिनी पुन्हा खोदकाम करून काढली जात आहे. सुमार दर्जाची जलवाहिनी असल्याने ती काढून पुन्हा नवीन जलवाहिनी घातली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांतून एलअँडटीच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी मनपाने एलअँडटीकडे सोपविली आहे. यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी पाणीपुरवठा महामंडळाकडे होती. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असल्याने 24 तास पाणीपुरवठा करण्याची योजना एलअँडटीकडून हाती घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी नवीन जलकुंभ उभारले जात आहेत. तर घरोघरी नळकनेक्शन देण्यासाठी गल्लोगल्लीत खोदकाम सुरू आहे.
शहरात 900 किलोमीटर जलवाहिनी घालण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 500 किलोमीटरपर्यंत जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी उद्यमबाग येथील कलमेश्वर हाऊसिंग कॉलनीत टेस्मो कंपनीची जलवाहिनी घालण्यात आली होती. मात्र, सदर जलवाहिनीचा दर्जा चांगला नसल्याने ती वापरण्यात येऊ नये. या ठिकाणी सदर कंपनीची जलवाहिनी घालण्यात आली आहे ती काढून चांगल्या कंपनीची जलवाहिनी घालण्यात यावी, अशी सूचना केली आहे. दोन वर्षांपूर्वी घालण्यात आलेल्या जलवाहिनीला नळजोडणीही देण्यात आली आहे. मात्र, आता गेल्या चार दिवसांपासून कलमेश्वर हाऊसिंग कॉलनीत खोदकाम करून जुनी जलवाहिनी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वीच स्थानिक रहिवाशांनी खोदकाम करण्यात आलेल्या चरीवर काँक्रिट, डांबर किंवा पेव्हर्स घालून चरी बुजवल्या आहेत. मात्र, आता पुन्हा खोदकामाचे सत्र सुरू झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच एलअँडटीकडून खोदकाम सुरू केल्याने याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
उद्यमबाग कलमेश्वर हाऊसिंग कॉलनीत दोन वर्षांपूर्वी टेस्मो कंपनीची जलवाहिनी घालण्यात आली होती. सदर जलवाहिनीचा दर्जा सुमार असल्याने ती काढून त्या ठिकाणी सुप्रिम, सुदर्शन किंवा वरुण या कंपनीच्या जलवाहिनी घातल्या जाणार आहेत. नळजोडणी त्याच जलवाहिनीला करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे.
– धीरज उभयकर, व्यवस्थापक एलअँडटी









