
वृत्तसंस्था /गिलाँग (ऑस्ट्रेलिया)
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या अ गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात मंगळवारी नेदरलँड्सने नामिबियाचा पाच गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील नेदरलँड्सचा हा दुसरा विजय आहे. दुसऱया एका सामन्यात लंकेने संयुक्त अरब अमिरातचा 79 धावांनी पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला. पहिल्या सामन्यात नामिबियाकडून लंकेला पराभव पत्करावा लागला होता.
नेदरलँड्स आणि नामिबिया यांच्यात झालेल्या अ गटातील पहिल्या फेरीतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकात 6 बाद 121 धावा जमविल्या. त्यानंतर नेदरलँड्सने 19.3 षटकात 5 बाद 122 धावा जमवित विजय नोंदविला. नेंदरलँड्स संघातील बेस डी लीडे ‘सामनावीर’ ठरला.
नामिबियाच्या डावात फ्रायलिन्कने 48 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 43, सलामीच्या व्हॅन लिनगेनने 19 चेंडूत 3 चौकारासह 20, स्टीफन बार्डने 19, कर्णधार इरासमूसने 16, वीजने नाबाद 11 धावा जमविल्या. नामिबियाच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. नेदरलँड्सतर्फे डी लीडेने 18 धावात 2, प्रिंगल, ऍकरमन, मिकेरेन आणि मेर्वे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेदरलँड्सच्या पहिल्या तीन फलंदाजांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला. मॅक्स ओदाऊद आणि विक्रमजित सिंग यांनी सलामीच्या गडय़ासाठी 59 धावांची भागीदारी केली. विक्रमजित सिंगने 31 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 39 तर मॅक्स ओदाऊदने 35 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 35, बेस डी लीडेने 30 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 30 धावा झळकविल्या. डी लीडे आणि प्रिंगल यांनी विजयाचे सोपस्कार 3 चेंडू बाकी असताना केले. नेदरलँड्सच्या डावात 3 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. नामिबियातर्फे स्मिटने 24 धावात 2 तर स्कोल्ट्झ आणि फ्रायलिन्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नेदरलँड्सने अ गटात आपले दोन्ही सामने जिंकून 4 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. नेदरलँड्सने पहिल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा तीन गडय़ांनी पराभव केला होता. आयसीसीच्या विश्वचषक टी-20 सुपर 12 संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने नेदरलँड्सची वाटचाल चालू आहे. नामिबियाने एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे. अ गटात लंकेने एक सामना जिंकला असून एक सामना गमवला आहे.
संक्षिप्त धावफलक
नामिबिया 20 षटकात 6 बाद 121 (फ्रायलिन्क 43, व्हॅन लिनगेन 20, बार्डड 19, इरासमूस 16, वीज नाबाद 11, डी लीडे 2-18, प्रिंगल, ऍकरमन, मिकेरेन, मर्वे प्रत्येकी एक बळी), नेदरलँड्स 19.3 षटकात 5 बाद 122 (मॅक्स ओदाऊद 35, विक्रमजित सिंग 39, डी लीडे नाबाद 30, प्रिंगल नाबाद 8, स्मिट 2-24, स्कोल्ट्झ, फ्रायलिन्क प्रत्येकी एक बळी).
लंकेची संयुक्त अरब अमिरातवर 79 धावांनी मात

मंगळवारी झालेल्या प्राथमिक फेरीच्या दुसऱया सामन्यात श्रीलंकेने संयुक्त अरब अमिरातचा 79 धावांनी दणदणीत पराभव करून आपला रनरेट अधिक चांगला राखला आहे. या सामन्यात लंकेच्या पथूम निशांकाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेने 20 षटकात 8 बाद 152 धावा जमविल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातचा डाव 17.1 षटकात 73 धावात आटोपला.
लंकेच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज निशांकाने 60 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 74, कुशल मेंडिसने 2 चौकारासह 18, धनंजय डिसिल्वा 21 चेंडूत 1 षटकात 3 चौकारासह 33 धावा जमविल्या. निशांका आणि मेंडीस यांनी सलामीच्या गडय़ासाठी 42 धावांची भर घातली. त्यानंतर निशांकाने डिसिल्वा समवेत दुसऱया गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केली. लंकेचे हे तीन फलंदाज वगळता बाकीच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. लंकेच्या डावामध्ये 3 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. संयुक्त अरब अमिरातर्फे मयप्पनने 19 धावांत 3, झहुर खानने 26 धावात 2 तसेच अफझल खान व लाक्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर संयुक्त अरब अमिरातचा डाव 17.1 षटकात 73 धावात आटोपला. या संघातील एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अफझल खानने 21 चेंडूत 1 चौकारासह 19, सिद्दिकीने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 तर चिराग सुरीने 19 चेंडूत 3 चौकारासह 14 धावा जमविल्या. अमिरातच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे डी. चमिरा आणि वणिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 3 तर महेश तीक्षणाने 2 त्याचप्रमाणे शनाका व लियानगमगे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या स्पर्धेत आता लंका आणि नेदरलँडस् यांच्यातील अ गटातील शेवटचा सामना गुरुवारी होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी लंकेला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे जरुरीचे आहे. तर नामिबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात दुसरा सामना खेळविला जाईल.
संक्षित धावफलक
श्रीलंका 20 षटकात 8 बाद 152 (पी. निशांका 74, कुशल मेंडीस 18, धनंजय डिसिल्वा 33, मयप्पन 3-19, झहुर खान 2-26, अफझल खान, लाक्रा प्रत्येकी एक बळी), संयुक्त अरब अमिरात 17.1 षटकात सर्वबाद 73 (अफझल खान 19, सुरी 14, सिद्दिकी 18, हसरंगा 3-8, डी. चमिरा 3-15, तीक्ष्णा 2-15, लियानगमगे आणि शनाका प्रत्येकी एक बळी).









