वृत्तसंस्था / थिंपू
17 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने आपला सलग दुसरा विजय नोंदविताना बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील झालेल्या या सामन्यात 14 व्या मिनिटाला पर्ल फर्नांडीसने भारताचे खाते उघडले. भारतीय महिला फुटबॉल संघाने मध्यंतरापर्यंत बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. बोनीफिला शुलाईने 76 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल करुन बांगलादेशचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. भारतीय महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेत आता आपल्या गटातून सलग दोन सामने जिंकत सहा गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. बांगलादेश संघाला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. भारताच्या भक्कम बचावफळीमुळे बांगलादेशचे अनेक हल्ले वाया गेले. 72 व्या मिनिटाला भारतीय महिला फुटबॉल महिला संघाने गोल करण्याची नामी संधी दवडली. या सामन्यामध्ये भारताच्या खेळाडूंमध्ये पासेस देताना योग्य समन्वय दिसून आला. 10 व्या मिनिटाला दिव्यानी लिंडाने डाव्या बगलेतून बांगलादेशच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण बांगलादेशच्या गोलरक्षकाने लिंडाचा हा फटका थोपविल्याने भारताला खाते उघडता आले नाही.









