प्रतिका रावलचे अर्धशतक, स्नेह राणाचे 5 बळी
वृत्तसंस्था / कोलंबो
तिरंगी वनडे महिलांच्या क्रिक्रेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 15 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय नोंदविला. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान लंकेचा 9 गड्यांनी पराभव केला होता. मंगळवारच्या सामन्यात प्रतिका रावलचे अर्धशतक आणि स्नेह राणाचे 5 बळी ही वैशिष्ट्यो ठरली.
या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 6 बाद 276 धावा जमविल्यानंतर द. आफ्रिकेचा डाव 49.2 षटकात 261 धावांत आटोपला.
भारताच्या डावामध्ये सलामीच्या प्रतिका रावलने 91 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 78 धावा जमविताना उपकर्णधार स्मृती मानधना समवेत सलामीच्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. मानधनाने 54 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. हर्लिन देवोलने 47 चेंडूत 4 चौकारांसह 29, कर्णधार हरमनप्रित कौरने 48 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 41, रॉड्रिग्जने 32 चेंडूत 4 चौकारांसह 41, रिचा घोषने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा केल्या. भारताच्या डावात 2 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे मलाबाने 2 तर खाका, क्लास, डी. क्लर्क आणि डेरेक्सन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. भारताने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 43 धावा केल्या. लंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही प्रतिका रावलने अर्धशतक झळकविले होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावाला कर्णधार वूलव्हर्ट आणि ब्रिट्स यांनी दमदार सुरूवात करुन देताना सलामीच्या गड्यासाठी 140 धावांची शतकी भागिदारी केली. वूलव्हर्टने 75 चेंडूत 3 चौकारांसह 43 धावा केल्या. मात्र ही जोडी फुटल्यानंतर द. आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. ब्रिट्सने 107 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह 109 धावा झळकविल्या. मात्र ब्dिरट्सचे शतक वाया गेले. लुसने 34 चेंडूत 4 चौकारांसह 28, ट्रायॉनने 1 चौकारांसह 18, डेरेक्सनने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा झळकविल्या. भारतातर्फे स्नेह राणा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 43 धावांत 5 गडी बाद केले. वनडे क्रिकेटमध्ये स्नेह राणाचे एका डावात 5 बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आली आहे. श्रीचरणी, अरुंधती रे•ाr आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पहिल्या पॉवरप्लेदरम्यानच्या 10 षटकात 61 धावा जमविल्या. ब्रिट्सला दुखापत झाल्याने संघाची स्थिती 33 षटकाअखेर 2 बाद 170 असताना ती तंबूत परतली होती. पण त्यानंतर तिने मैदानात प्रवेश केला. पण तिने केवळ 1 धाव जमविली. ती 109 धावांवर असताना स्नेह राणाने तिचा अप्रतिम झेल घेतला.
संक्षिप्त धावफलक: भारत 50 षटकात 6 बाद 276 (प्रतिका रावल 78, मानधना 36, देवोल 29, हरमनप्रित कौर नाबाद 41, रॉड्रिग्ज 41, घोष 24, अवांतर 13, मलाबा 2-55, खाका, क्लास, डी. क्लर्क, डेरेक्सन प्रत्येकी 1 बळी), द. आफ्रिका 49.2 षटकात सर्वबाद 261 (ब्रिट्स 109, वूलव्हर्ट 43, लुस 28, डेरेक्सन 30, स्नेह राणा 5-43, रे•ाr, श्रीचरणी आणि दिप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी.









