बेक फेल टेम्पो दरीत कोसळला, जखमी तिघांनाही वाचवण्यात सहय़ाद्री टेकर्सला यश
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असणाऱया दरे याठिकाणी जाणाऱया रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रक कोसळून 42 मजूर जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच दुसऱया दिवशीच बेक फेल टेम्पो दरीत 200 फूट कोसळल्यामुळे तिघे जण जखमी झाले. मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे जाणाऱया रस्त्यावर सलग दुसऱया अपघातामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात मेटगुताड येथून तापोळाच्या दिशेने इलेक्ट्रिक साहित्य घेऊन निघालेल्या 407 टेम्पो एम. एच. 11 एजी 7745 चा ब्रेक फेल झाल्याने थेट दोनशे फूट दरीत कोसळला. या अपघातात तीन युवक जखमी झाले असून हा अपघात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
मेटगुताड येथून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन रविवारी सायंकाळी टेम्पो तापोळाच्या दिशेने निघाला होता. चिखली शेड परिसरातील वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो थेट दोनशे फूट दरीत कोसळला. झाड व चिमटीमध्ये टेम्पो अडकला त्यात तीन युवक होते. रात्रीच्या अंधारात यामधील एक युवक झाड, फांद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला. या अपघाताची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱया लोकांना दिली.
या अपघाताची माहिती मिळताच चिखलीचे शिवसेनेचे संतोष जाधव व सहकारी तसेच सहय़ाद्री ट्रेकर्सचे किरण चव्हाण, संजय पार्टे व दीपक जाधव यांनी अंधारात अपघातातील जखमींना बाहेर काढले व 108 रुग्णवाहिका तसेच संतोष जाधव यांच्या खासगी गाडीने ग्रामीण रुग्णालयात आणले. श्रीकांत गणपत बावळेकर (वय 24), विजय बजरंग मोरे (वय 25) व सुरज यशवंत घाडगे (वय 26) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात एका युवकाचा पाय प्रॅक्चर झाला आहे तर एकाला किरकोळ दुखापत झाली असून एकाच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी दोघांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.








