पृथ्वीपासून आता कमाल अंतर 40,225 किमी : 10 सप्टेंबरला तिसऱ्यांदा कक्षेत होणार बदल
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोने मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी आदित्य एल1 अंतराळयानाची कक्षा दुसऱ्यांदा वाढविली आहे. आता हे यान पृथ्वीच्या 282 किमी गुणिले 40,225 किमीच्या कक्षेत पोहोचले आहे. म्हणजेच यानाचे पृथ्वीपासूनचे सर्वात कमी अंतर 282 किलोमीटर तर कमाल अंतर 40,225 किलोमीटर इतके आहे.
या मोहिमेदरम्यान उपग्रहाला मॉरिशस, बेंगळूर आणि पोर्ट ब्लेयर येथील इस्ट्रॅक/इस्रोच्या ग्राउंड स्टेशन्समधून ट्रॅक करण्यात आले. आता 10 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 2.30 वाजता तिसऱ्यांदा आदित्य एल1 ची कक्षा वाढविण्यासाठी काही वेळासाठी थ्रस्टर फायर करण्यात येणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.
आदित्य एल1 ला 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता पीएसएलव्ही-सी57 च्या एक्सएल वर्जन रॉकेटद्वारे श्ऱीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. प्रक्षेपणाच्या 63 मिनिटे 19 सेकंदांनी यानाला पृथ्वीच्या 235 किमी गुणिले 19,500 किलोमीटरच्या कक्षेत स्थापित करण्यात आले होते.
सुमारे 4 महिन्यांनी आदित्य एल1 हे 15 लाख किलोमीटर अंतरावरील लँगरेज पॉइंट-1 पर्यंत पोहोचणार आहे. या पॉइंटवर ग्रहणाचा प्रभाव पडत नसल्याने तेथून सूर्यासंबंधी संशोधन करणे सोपे ठरणार आहे. लँगरेज पॉइटचे नाव इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफी-लुई लँगरेज यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संतुलित होत सेंट्रिफ्युगल फोर्स ठरणारे 5 पॉइंट आहेत. अशा स्थितीत या पॉइंटवर एखादे ऑब्जेक्ट ठेवल्यास ते सहजपणे त्या पॉइंटच्या चहुबाजूला फेऱ्या मारण्यास सुरुवात करते. पहिला लँगरेज पॉइंट पृथ्वी आणि सूर्यादरम्यान 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
एल1 पॉइंटच्या आसपास हेलो ऑर्बिटमध्ये पोहोचविले जाणारे यान सूर्याला कुठल्याही ग्रहणाशिवाय सातत्याने पाहू शकते. यामुळे रियल टाइम सोलर अॅक्टिव्हिटीज आणि अंतराळातील हवामानावरही नजर ठेवता येणार आहे. हे यान 6 जानेवारी 2024 रोजी एल1 पॉइंटपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.









