सैन्याला रसद पुरविण्याचा मार्गच नष्ट : कब्जा केलेल्या भागत युक्रेन बफर झोन तयार करणार
वृत्तसंस्था/ कीव्ह/मॉस्को
युक्रेनने रशियातील कुर्स्कमध्ये हल्ला करत आणखी एक महत्त्वाचा पूल नष्ट केला आहे. युक्रेनच्या वायुदलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनी सोशल मीडियावर याच्याशी निगडित व्हिडिओही जारी केला आहे. या पूलाचे अत्यंत रणनीकि महत्त्व होते. हा पूल तुटल्याने आता रशियाच्या रसद पुरवठ्यावर मोठा प्रभाव पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर युक्रेनने दोन दिवसांपूर्वी कुर्स्कच्या ग्लुशकोवोमध्ये आणखी एक पूल पाडविला. हा पूल सीम नदीवर उभारण्यात आला होता आणि तो युक्रेनच्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर होता. ज्वानोए गावात सीम नदीवर उभारण्यात आलेला पूल नष्ट करण्यात आल्याची माहिती रशियाकडून देण्यात आली होती. कुर्स्कमध्ये 3 पूल होते आणि आता यातील केवळ एकच पूल शिल्लक राहिला आहे.
बेलारुस सीमेवर मोठा बंदोबस्त
युक्रेनने बेलारुसच्या सीमेवर देखील हजारो सैनिक तैनात केले आहेत. यासंबंधीचा दावा बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको यांनी केला आहे. युक्रेनने जुलैच्या सुरुवातीला बेलारुसच्या सीमेवर 1 लाख 20 हजार सैनिक तैनात केले होते आणि त्यानंतर या संख्येत वाढ केल्याचा दावा लुकाशेंको यांनी केला आहे. युक्रेनच्या पावलाच्या प्रत्युत्तरादाखल बेलारुसचे एक तृतीयांश सैन्य सीमेवर तैनात करण्यात आले आहे. 2022 मध्ये बेलारुसकडे 60 हजार सैनिक होते. बेलारुसचे 20 हजारांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात असल्याचे मानले जात आहे.
बफर झोनचा निर्णय
बफर झोन निर्माण करता यावा म्हणून आम्ही कुर्स्क भागावर हल्ले करत आहोत असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी म्हटले आहे. बफर झोनमध्ये दोन देशांदरम्यान रिकामी जागा असते आणि त्यावर कुणाचाच कब्जा नसतो. युक्रेनने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ले सुरू केले होते. यानंतर रशियाने कुर्स्कमध्ये आणीबाणी लागू केली होती. यानंतर रशियाने बेलगोरोदमध्ये देखील आणीबाणी लागू केली. युक्रेनने 16 ऑगस्टपर्यंत रशियाच्या 1,150 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. युक्रेनच्या अचानक हल्ल्यानंतर 2 लाखाहून अधिक रशियन नागरिकांना सुरक्षितस्थळी पलायन करावे लागले आहे.
सुद्जामध्ये कमांड सेंटर
युक्रेनच्या सैन्याने रशियन शहर सुद्जावर कब्जा केला आहे आणि तेथे सैन्य कमांड सेंटर सुरू केले आहे. सुद्जा हे युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 5 हजार इतकी आहे. येथे रशियाचे एक गॅस पाइपलाइन स्टेशन आहे. याच्या मदतीने रशियाकडून युरोपीय देशांना गॅस पुरवठा करण्यात येतो. युक्रेनचे सैन्य रशियात 35 किलोमीटर आत शिरले असून किमान 82 गावांवर कब्जा केला आहे. युक्रेनने रशियाच्या 150 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले असून यात बहुतांश करून सैनिक आहेत. रशियाने सीमेवर मोठ्या संख्येत युवा सैनिक तैनात केले आहेत. यातील अनेक जण हे लढण्यायोग्य नाहीत. तसेच ते लवकर हार मानत असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.