वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात पाकिस्तानचा अर्शद नदीमने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पाकला या स्पर्धेत एकमेव ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल पाक शासनातर्फे अर्शद नदीमचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पाक शासनातर्फे अर्शद नदीमला ‘हिलाल इ इम्तियाज’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जाणार आहे.
पुढील आठवड्यात पाकिस्तान आपला 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. यावेळी 27 वर्षीय अर्शद नदीमला पाकतर्फे सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. भालाफेक प्रकारात सुवर्णपदकासाठी प्रामुख्याने अर्शद नदीम आणि भारताचा नीरज चोप्रा यांच्यात खरी चुरस होती. पण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये राखता आले नाही. अर्शद नदीमने या क्रीडा प्रकारात 92.97 मी. चा भालाफेक करत नव्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. पाकिस्तानला ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 40 वर्षांनंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल अर्शद नदीमचे संपूर्ण पाक देशामध्ये कौतुक होत आहे. अर्शद नदीमच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. पाकमधील पंजाब प्रांतातील तो रहिवासी असून पंजाबचे मुख्यमंत्री एम. नवाज यांनी अर्शद नदीमला 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून सिंध शासनातील पिपल्स पक्षातर्फे त्याला 50 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पंजाबमधील खेनवाल येथे त्याला शासनातर्फे नवीन वास्तू बांधून दिली जाणार आहे. सिंध प्रांतातील सुखूर शहराला आता अर्शद नदीमचे नाव दिले जाणार आहे.









