वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अदानी प्रकरणात सेबी या शेअरबाजार नियंत्रक संस्थेने आपला 41 पृष्ठांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. अदानी उद्योगसमूहावर अमेरिकेतील हिंडेनबर्ग या शॉर्टसेलर संस्थेने गंभीर आर्थिक आरोप केल्याचे प्रकरण गेल्या वर्षाच्या अखेरीस गाजले होते. त्यामुळे अदानी समूहाच्या समभागांची किंमत प्रचंड प्रमाणात घसरल्याने गुंतवणूकदारांचे लक्षावधी कोटी रुपये गमावले गेले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालात या प्रकरणासंबंधीं याचिका सादर करण्यात आली होती. न्यायालयाने चौकशीसाठी स्वत:ची समिती नेमली होती. तसेच सेबीलाही विशिष्ट कालावधीत चौकशी करण्याची सूचना केली होती.
न्यायालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल यापूर्वीच न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातील निष्कर्षांमुळे अदानी समूहाला दिलासा मिळाला होता. अदानी समूहाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला होता. आता सेबीनेही चौकशी पूर्ण केली असून अहवाल सादर केला आहे.
आजच सुनावणी
सेबीने सादर केलेल्या अहवालावर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या अहवालाच्या प्रती या प्रकरणातील सर्व पक्षकारांना दिल्या जाणार आहेत. या अहवालात कोणते निष्कर्ष काढण्यात आले आहेत, हे तपासले जाणार आहे. निष्कर्ष योग्य प्रकारे आणि कायदेशीर निकषांवर काढण्यात आले आहेत की नाहीत, हे तपासून सर्वोच्च न्यायालय हा अहवाल स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्वाची मानली जात आहे.









