वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खाद्य पदार्थांचा पुरवठा करणारी स्विगी या कंपनीला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणजेच आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. शेअर बाजारातील नियामक संस्था सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी यांनी अखेर मंजुरी दिली आहे. प्रोसस, सॉफ्ट बँक आणि एक्सेल यासारख्या गुंतवणूकदारांचे पाठबळ या कंपनीला लाभलेले आहे. 30 एप्रिल रोजी कंपनीने आयपीओसाठी अर्ज सादर केला होता. स्विगी या आयपीओच्या माध्यमातून 11 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. ज्यामध्ये 5 हजार कोटी रुपयांचे ताजे समभाग अस तील, असेही कंपनीने म्हटले आहे.
दुसरी कंपनी
खाद्य पुरवठा क्षेत्रामधील स्विगी ही झोमॅटोनंतर शेअर बाजारात दाखल होणारी दुसरी मोठी कंपनी असणार आहे. झोमॅटोचे समभाग 23 जुलै 2021 रोजी शेअरबाजारात सुचीबद्ध झाले होते, तेही 115 रुपयांवर. झोमॅटोचे सध्याचे मूल्य हे 2.6 ट्रिलियन इतके आहे.
कधी येणार आयपीओ
सेबीची मंजुरी मिळवल्यावर आता कंपनी आयपीओ सादर करण्याच्या नियोजनात गुंतली आहे. सदरचा स्वीगीचा आयपीओ हा नोव्हेंबरमध्ये बाजारामध्ये येणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्या दृष्टीने कंपनीने आपल्या हालचाली गतीमान केल्या आहेत.