नवी दिल्ली :
बोईंग 787 ड्रीमलाईनरच्या संदर्भात सध्या या विमानांमधील 11 अ क्रमांकाचे आसन जागतिक चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकारच्या विमानांच्या गेल्या 30 वर्षांमध्ये काळात दोन भीषण दुर्घटना झाल्या आहेत. या दोन्हींमध्ये आसन क्रमांक 11 अ वर बसलेले प्रवासी आश्चर्यकारकरित्या दुर्घटनेमधून वाचलेले आहेत.
11 डिसेंबर 1998 या दिवशी ड्रीमलायनर विमानाच्या दुर्घटनेत थायलंडचा अभिनेता आणि गायक आणि त्यावेळेला 20 वर्षांचा असणारा रुवांगसाक लॉयवुसाक हा या क्रमांकाच्या आसनावर दुर्घटनेच्या वेळी बसला होता. त्या दुर्घटनेत विमानातील 143 प्रवाशांपैकी 101 जणांचा मृत्यू झाला होता. तथापि, लॉयवुसाक हा मोठा भाग्यवंत ठरला होता आणि त्याचा जीव वाचला होता.
रमेशही भाग्यवान
12 जूनला अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेत 11 अ याच क्रमांकांच्या आसनावर बसलेले विशाल रमेश हे वाचले आहेत. ते ब्रिटनचे नागरीक असून लंडनला परत निघालेले होते. विमान कोसळल्यानंतर त्यांचे आसन दरवाजाबाहेर पडले आणि आसनासमवेत तेही बाहेर फेकले गेले होते. मात्र, त्यामुळे ते आगीच्या ज्वाळांपासून दूर गेले होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला होता. हे वृत्त समजल्यानंतर लॉयवुसाक यांनी एक्सवर संदेश पाठवून रमेश यांचे अभिनंदन केले आहे. तर आपल्या स्वत:चा असाच अनुभवही त्यांनी कथन केला आहे. अशा प्रकारे 11 अ हे विमानाच्या दरवाजाजवळचे आसन दोन जीव वाचविणारे ठरले आहे.
रमेश यांच्या प्रकृतीत सुधारणा
गुरुवारच्या विमान दुर्घटनेतून वाचलेले एकमेव प्रवासी विशालकुमार रमेश यांच्यावर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. विमान कोसळल्यानंतर त्यांचे आसन दूर फेकले गेल्याने ते या दुर्घटनेतून वाचले होते. तथापि, त्यांना धक्का बसल्याने त्यांच्या शरीराला काही ठिकाणी मुका मार लागला होता. अहमदाबाद येथील रुग्णालयात सध्या ठेवण्यात आले असून त्यांचे कुटुंबियही त्यांच्यासमवेत आहेत. ते पूर्णत: शुद्धीत असून अन्नपाणी घेत आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. आपण या दुर्घटनेतून वाचलो आहोत, या घटनेवर त्यांचा अद्यापही विश्वास बसत नाही, असे त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे.









