वृत्तसंस्था/ लंडन
रुमानियाची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सिमोना हॅलेप उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस एजन्सीने शुक्रवारी हंगामी बंदीचा निर्णय जाहीर केला आहे.
31 वषीय सिमोना हॅलेप उत्तेजक चाचणीत दोषी आढळली. निर्बंध घातलेले द्रव तिच्या चाचणीमध्ये आढळून आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस एजन्सीच्या उत्तेजक विरोधी प्रोगॅमनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत हॅलेप नवव्या स्थानावर आहे. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेवेळी टेनिसपटूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीच्यावेळी हॅलेपची ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. पण या नमुन्यांमध्ये निर्बंध घातलेली विविध द्रव्ये आढळून आली. आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सी (आयटीआयए) यांच्या या निर्णयामुळे आपण पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असून आपण निर्दोष असल्याचा दावा हॅलेपने केला आहे. या निर्णयाविरुद्ध आपण कायदेशीर लढा देणार असल्याचेही तिने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गेल्या 25 वर्षांपासून आपण या क्षेत्रात वावरत असून या क्षेत्राला काळिमा फासण्याचे कृत्य माझ्याकडून कधीच होणार नाही, अशी ग्वाही हॅलेपने दिली आहे.









