राज्यातील ग्रामीण भागात चैत्र महिन्याला सुरूवात झाल्यानंतर गावा-गावच्या यात्रांना सुरूवात झालेली बघायला मिळते. रामनवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतियेच्या निमित्ताने गेली वर्षानुवर्ष यात्रांची परंपरा आहे, आता गावो गावच्या यात्रांना सुरूवात झाली आहे. मात्र राज्याच्या राजकारणात 2019 नंतर झालेले स्थित्यंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि त्यानंतर 2022 शिवसेनेत झालेली बंडखोरी बघता 2019 पासून राज्यात राजकारण्यांच्या सुरू झालेल्या यात्रा अद्याप संपलेल्या नाहीत. भाजपची जन आशिर्वाद यात्रा, ठाकरे गटाची निष्ठा यात्रा, काँग्रेसची भारत जोडो यात्रा, राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा आणि आता शिवसेना भाजपची सावरकर गौरव यात्रा मात्र या सगळ्य़ा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जत्रेची घोषणा गेल्या आठवडय़ात केली होती ती जत्रा होती. शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठीची जत्रा खऱयाअर्थाने लोकांना आज यात्रेची नाही तर या जत्रेची गरज आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर राज्यातील राजकारणात याचे चांगलेच पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले. उध्दव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपने नेहमीच शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे याही वेळेला राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर भाजपने काँग्रेसला कमी आणि शिवसेनेला जास्त टार्गेट केले. अखेर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिल्यानंतर इकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीच्या युतीची वज्रमुठ ही भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी असल्याने, ही युती दीर्घ काळ राहणे हे भाजपसाठी परवडणारे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर यात्रेच्या निमित्ताने ठाकरे यांच्याकडे असलेली हिंदुंची पारंपारिक मते शिंदे यांच्याकडे वळविण्यासाठी गौरव यात्रेचा भाजप जोरदार प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सावरकरांच्या मुद्यावरुन शिवसेनेची गोची करणे आणि महाविकास आघाडीची युती दुभंगली पाहिजे यासाठीही वेळोवेळी भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेला खिंडीत गाठायचा प्रयत्न केला. मात्र उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक वेळी मी भाजपला सोडले हिंदुत्व नाही आणि हिंदुत्व म्हणजे भाजप नाही असे सांगत भाजपच्या हिंदुत्वाच्या भुमिकेवर आक्षेप घेतला. राजकारणात विचारधारा बदलली की आपली मतेही बदलतात. कधीकाळी वेगळय़ा विदर्भाचा पुरस्कार करणारे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री होताच आपली भूमिका बदलल्याचे बघायला मिळाले.
राज्यात 2019 झालेल्या सत्तांतरानंतर ज्या पध्दतीने गेल्या 3 वर्षात ज्या यात्रा निघाल्या आणि अजुनही निघत आहेत त्या पाहता कधीच इतक्या राजकीय यात्रा निघाल्या नव्हत्या. पूर्वी केवळ निवडणुकीच्या तोंडावर यात्रा निघत असत, मात्र आता भाजपची जनआशिर्वाद यात्रा, तर शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेची निष्ठा यात्रा, काँग्रेसची भारत जोडो यात्रा राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा या यात्रेच्या निमित्ताने केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी आणि आपली भूमिका मांडण्यासाठी राजकारण्यांनी या यात्रांचा वापर केल्याचे बघायला मिळाले. आता शिवसेना-भाजप देखील सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांच्या कार्याचा गौरव केला, पण त्यांनी केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नाही केला तर त्यांनी मुंबईतील दादर येथे आज उभे असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उभारण्यासाठी मुंबई महापालिकेचा भुखंड दिला इतकेच नव्हे तर हे यथोचित स्मारक व्हावे यासाठी स्वतः यात लक्ष घातले होते. स्वर्गीय सुधीर फडके हे सावरकर भक्त होते, त्यांनी सावरकरांची महती त्यांचे कार्य जगभरातील लोकांपर्यत चित्रपटाच्या माध्यमातून पोहचविण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हिंदीतून काढला. यावेळी त्यांनी स्वतः गीत रामायणाचे जवळपास 50 प्रयोग केले आणि त्यातून आलेले मानधन हे चित्रपटासाठी वापरले. या चित्रपटात काम करणाऱया सर्व कलाकारांनी त्यांनी मानधनही दिले. खऱया अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव हा बाबुजींनी त्यावेळी केला होता, लोक आधीच राजकारण्यांना कंटाळली आहेत. त्यांच्या हेतुबद्दल शंका असल्याने अशा पध्दतीने गौरव यात्रा काढून खरंच त्या व्यक्तीचा गौरव होणार का? हा मोठा प्रश्न आहे.
मुंबईतील बोरीवली येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा गौरव सांगणारे अटल स्मृती केंद्र उभारण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने उभारलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असो किंवा रामभाऊ म्हाळगींच्या नावाने उभारलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी असो या संस्थांच्या माध्यमातून जे काही वर्षभर सामाजिक आणि शैक्षणिक कार्य होत आहे तशा पध्दतीने वर्षभर सावरकरांच्या कार्याचा गौरव होणारे आणि त्यातून प्रेरणा मिळणारी वास्तु उभारावी. आता तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावानेही सरकार स्मारक उभारणार आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा देखील पुतळा वानखेडे स्मारकावर उभारला जाणार असताना सरकारने सावरकरांच्या कार्याचा 365 दिवस गौरव करणारी एखादी वास्तु उभारावी जेणेकरुन त्यांच्या कार्याचा खरा गौरव होईल.
प्रवीण काळे








