कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्ह्यातील गळीत हंगाम 2024-25 चा समारोप झाला असून कोल्हापूर विभागात गत हंगामाच्या तुलनेत यंदा ऊस गाळप आणि साखर उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात 2.02 कोटी मे.टन इतके ऊसाचे गाळप झाले आहे. तर 2.23 कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गतहंगामातील आकडेवारी पाहता सुमारे 40 लाख मे.टन ऊसाचे गाळप कमी झाले असून 31 लाख क्विंटलने साखर उत्पादन घटले आहे.
नैसर्गिक असमतोलाचा फटका यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. प्रदीर्घ काळ पडणारा पाऊस तसेच अतिवृष्टी याचा परिणाम ऊस पिकावर होत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या महापूराच्या काळात महापूराचे पाणी गतीने पसरते मात्र ओसरताना हे पाणी संथ गतीने ओसरते. यामुळे शेतामध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिल्याने ऊसाची वाढ खुंटते व उतारा कमी येतो. तसेच ऊसाला तुरेही लवकर आल्याने केवळ उसाची वाढ झाली मात्र हेक्टरी उत्पादनात घट झाली. यासर्वबाबींचा यंदाच्या हंगामात ऊसाच्या वजनावर आणि साखर उत्पादनावर झाला आहे. साखरेचा उतारा घटल्याने साखर उत्पादनातही घट झाली आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात झालेली घट याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना बसणार आहे.
- कोल्हापूर 1.24 कोटी, सांगलीत 77 लाख टन गाळप
कोल्हापूर जिल्ह्यातील 23 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडुन यंदाच्या हंगामात 1 कोटी 21 लाख 98 हजार 750 मे.टन इतका ऊस गाळप केला आहे. तर सांगली जिल्ह्यातील 17 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी 77 लाख 06 हजार 364 मे.टन ऊस गाळप केला आहे. विभागात एकूण 2 कोटी 2 लाख 5 हजार 114 मे.टन इतके गाळप झाले आहे.
- विभागात 2.23 कोटी क्विंटल साखर उत्पादन
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून एकूण 1 कोटी 42 लाख 6 हजार 941 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तर सांगली जिल्ह्यात 81 लाख 46 हजार 540 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन झाले आहे. विभागात एकूण 2 कोटी 23 लाख 53 हजार 481 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कोल्हापूरचा निव्वळ साखर उतारा 11.37 टक्के, सांगलीचा 10.57 तर कोल्हापूर विभागाचा निव्वळ साखर उतारा 11.06 टक्के इतका राहिला आहे.
- 270 कोटी रुपये एफआरपी थकीत
कोल्हापूर विभागात सुमारे 270 कोटी रुपये एफआरपी थकीत राहिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांनी 224.77 कोटी रुपये तर सांगली जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी 44.91 कोटी रुपये एफआरपी थकवली आहे.
- साखर उत्पादन, साखर उताराची आकडेवारी पुढीलप्रमाणे–
कारखाना ऊस गाळप उत्पादन उतारा
(मे.टनमध्ये) (क्विंटलमध्ये) (टक्केमध्ये)
आजरा 278358 331250 12
भोगावती 421788 537870 12.28
छ.राजाराम, क.बावडा 293070 339210 11.66
छ. शाहू, कागल 743070 724650 9.1
श्री दत्त, शिरोळ 1070752 1160700 10.77
दूधगंगा, वेदगंगा बिद्री 647878 786600 12.08
जवाहर हुपरी 1355328 1646730 12.14
मंडलिक, हमिदवाडा 307566 336870 12.23
कुंभी–कासारी, कुडीत्रे 478820 597470 12.58
पंचगंगा, इचलकरंजी 646672 800010 12.27
शरद, नरंदे 400003 479860 11.98
तात्यासाहेब कोरे, वारणानगर 1154619 1295695 10.96
अथणी शुगर, सोनवडे–बांबवडे 438523 472650 10.38
डॉ. डी. वाय. पाटील, गगनबावडा 465670 450250 9.62
अथर्व, हलकर्णी, चंदगड 406695 473150 11.65
अप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज 170178 192500 11.67
दालमिया, आसुर्ले–पोर्ले 920650 1087425 11.9
गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी 512021 579360 9.93
इको–केन म्हाळुंगे, चंदगड 309641 379100 12.44
ओलम राजगोळी, चंदगड 491377 523850 10.75
संताजी घोरपडे, कागल 485994 409912 8.5
रिलाबल शुगर फराळे, राधानगरी 197921 243773 12.3
अथणी शुगर, भुदरगड 302156 358055 11.73
एकूण 12498750 14206941 11.37








