विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना झटका ः माकपने फेटाळली राष्ट्रीय आघाडीची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) राष्ट्रीय स्तरावर मुख्य विरोधी पक्षांच्या कुठल्याही आघाडीची शक्यता फेटाळली आहे. माकपने स्वतःचे मुखपत्र पीपल्स डेमोक्रेसीमध्ये राष्ट्रीय आघाडीऐवजी महत्त्वपूर्ण राजकीय विषयांवर विरोधी पक्षांकडून संयुक्त भूमिका घेतली जाऊ शकते असे नमूद केले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यान माकपने राष्ट्रीय स्तरावरील आघाडी अशक्य असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय स्तरावर कुठल्याही एका चेहऱयाचा शोध निरर्थक असल्याचेही माकपकडून नमूद करण्यात आले.
कुठल्याही राज्यात सर्वात मजबूत विरोधी पक्ष, भले मग एक तो प्रादेशिक पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष त्याला भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांसोबत थेट आमने-सामनेची राजकीय लढाई सुनिश्चित करण्यासाठी अटी निश्चित करण्याची अनुमती देण्याचा प्रकार अद्याप खूपच दूर आहे. याचबरेबर विरोधी पक्षांमधील जटिलता आणि काम करण्याच्या वेगवेगळय़ा पद्धती पाहता हे शक्य नसल्याचे म्हटले गेले आहे.
माकपने स्वतःच्या मुखपत्रात राष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या आघाडीच्या स्वरुपात विरोधी एकता निर्माण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट व्हावे असे नमूद केले आहे. भाजपविरोधातील राजकीय लढाईचे यश सर्व जागांवर एका विरोधात एक अशी लढाई सुनिश्चित होण्यावर निर्भर असल्याचा हा चुकीचा विचार एका संकीर्ण भूमिकेतून निर्माण झालेला आहे. अदानी समुहावरील आरोप अन् जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या खुलाशांप्रकरणी विरोधी पक्ष एकजूट होऊ शकतात असे माकपच्या मुखपत्रात म्हटले गेले आहे. तर दुसरीकडे माकपचे महासचिव सीताराम येच्युरी हे विरोधी पक्षांच्या आघाडीशी निगडित बैठकांमध्ये सामील होत आहेत.









