गोव्यातून ड्रेजर यंत्रणेला पाचारण : तीन महिन्यातील तिसऱ्यांदा मोहीम
कारवार : शिरुर येथील दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या त्या तीन व्यक्तींचा आणि लॉरीचा शोध घेण्यासाठी शुक्रवारपासून तिसरी आणि अंतिम शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. 16 जुलैला कारवार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर दरड कोसळून 11 जण बेपत्ता झाले होते. शिवाय केरळमधील एक लॉरी बेपत्ता झाली होती आणि गॅसची वाहतूक करणारा टँकर गंगावळी नदीतून वाहून गेला होता. दुर्घटनेनंतर युद्ध पातळीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे बेपत्ता झालेल्यांपैकी 8 जणांचे मृतदेह हाती लागले होते. टँकरही गंगावळी नदीतून बाहेर काढण्यात आला होता. अत्याधुनिक यंत्रणेसह अनेक दिवस शोधमोहीम हाती घेऊनही केरळमधील लॉरीसह चालक अर्जुन, स्थानिक जगन्नाथ नाईक आणि लोकेश नाईक यांचे मृतदेह हाती लागले नव्हते. त्यामुळे शोधमोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
त्यानंतर कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. तरी सुद्धा अपेक्षित यश मिळाले नव्हते. पुढे दुसरी मोहीमही तांत्रिक अडचणींमुळे स्थगित करण्यात आली होती. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात सातत्याने अपयश येऊनही आमदार सतीश सैल स्वस्थ बसायला तयार नाहीत आणि म्हणूनच शुक्रवारी पुन्हा एकदा गंगावळी नदीत तिसरी आणि अंतिम शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याकरिता गोव्यातून ड्रेजर यंत्रणेला पाचारण करण्यात आले आहे. ड्रेजर गंगावळी नदीत नांगरण्यात आले आहे.
ड्रेजरक्रेन आणि हिताची यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे. पाईप लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी एनडीआरएफचे पथक, पोलीस दल आणि अंकोला तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाचा जोर ओसरल्याने गंगावळी नदीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात घट झाली आहे. दुर्घटनेनंतर नदीच्या पात्रात कोसळलेले मातीचे ढिगारे ड्रेजरद्वारे हटवून नाविक दलाला निश्चित केलेल्या चार ठिकाणी ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. किमान आतातरी शोधमोहीम यशस्वी होऊन दोन महिन्याहून अधिक काळ बेपत्ता झालेल्या अर्जुन, जगन्नाथ आणि लोकेश यांच्याबद्दल धागेदोरे सापडणार का याकडे बेपत्ता असलेल्यांच्या कुटुंबीयांचे डोळे लागून राहिले आहेत.