ऑनलाईन टीम / तरुण भारत :
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील शोधमोहिम थांबविण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 27 वर पोहचला असून, अद्याप 57 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असणाऱ्या लोकांना मृत घोषित करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांची खालापूर पोलीस ठाण्यात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, बुधवारी रात्री 11 वाजता रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. घटनास्थळी आज सलग चौथ्या दिवशी शोधमोहिम आणि बचावकार्य सुरू होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले आहेत. तर 57 जण अजूनही बेपत्ता आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. शोध कार्यामध्ये मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत. त्यामुळे शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेपत्ता दरडग्रस्तांना मृत घोषित केले जाणार आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.








