कळंगूट ग्रामसभेत निर्णय : विविध प्रश्नांमुळे ग्रामसभा गाजली
प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट येथे डान्स बार वाढत आहेत. त्यामुळे दलालांची संख्याही वाढली आहे. सदर दलाल पर्यटकांना त्रास देत असून हे प्रकार रोखा अशी मागणी ग्रामस्थांनी रविवारी 18 रोजी झालेल्या ग्रामसभेत केली. हॉटेल किंवा इतर आस्थापनांमध्ये गैरप्रकार आढळला तर ते सील करू अशी ग्वाही सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी ग्रामस्थांना दिली.
कळंगूट पंचायतीने आयोजित केलेल्या पहिल्याच ग्रामसभेत वाढत्या डेंग्यूचे रुग्ण, भटक्या गुरांचा बंदोबस्त, दलालांची वाढती संख्या, कुचकामी कचरा व्यवस्थापन यंत्रणा, बेशिस्त पार्किंग, शेतजमिनीत बेकायदेशीरपणे मातीचा भराव टाकणे आदी विषयांवर चर्च झाली. सभेस मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावात सुरू असलेल्या डान्सबारच्या मुद्यावरून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले. या मुद्यावरून सुरळीत सुरू असलेल्या ग्रामसभेत गोंधळ सुरू झाला. बेकायदा डान्स बारवर व दलालांच्या वाढत्या उपद्रवामुळे गावची बदनामी होत आहे. सदर दलाल पर्यटकांच्या मागे लागतात. त्यातून मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार घडत आहेत. त्यावर पंचायत कोणती कारवाई करणार अशी विचारणा ग्रामस्थांनी केली. सरपंच सिक्वेरा यांनी सांगितले की, गावात कार्यरत असलेल्या डान्स बारना नोटीस दिली जाईल. जर त्या ठिकाणी वेश्या व्यवसायासारखे अनैतिक प्रकार सुरू असल्याचे आढळले तर पंचायत तो परस्पर सील करेल. येथील दलालांवर कारवाई करण्यासाठी कळंगूट पोलिसांना पत्र दिल्याचे सरपंचानी सांगितले.
सुरुवातीला मागील वर्षी झालेल्या ग्रामसभेचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. चालू आर्थिक वर्षात करावयाच्या अनेक कामांच्या अंदाजपत्रकाचेही वाचन करण्यात आले. यावर ग्रामस्थ प्रेमानंद दिवकर म्हणाले की, अर्थसंकल्पातील आकडे केवळ फुगवलेले आहेत. कचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांनी जे सूचविले होते त्याकडे दुर्लक्ष झाले. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी कचरा क्षेत्राचे विभाग कारवे. ज्याद्वारे कोणत्या भागात सर्वात जास्त कचरा टाकला गेला आहे हे दिसून येईल. सरपंच सिक्वेरा यांनी दिवकर यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली.
कळंगूट मार्केटकडे जाणाऱया मार्गालगत कचरा टाकण्यात येत असल्याचा मुद्दा डेन्झिल डिसोझा यांनी उपस्थित केला. अँथनी मिनेझीस यांनी पंपिंग स्टेशनची सद्यस्थिती घेण्याची मागणी केली. पंपिंग दुसऱया ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे कारण सध्या स्टेशन ज्या जागेत आहे ती जागा मंदिराची असल्याचे सरपंचानी सांगितले.
शेतजमिनीत बेकायदेशीर भराव टाकला जात असेल तो काढून पंचायतीकडे पाठवण्याची मागणी सरपंचानी केली. पंचायत काम करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी एकनाथ नार्वेकर यांनी कळंगूट असोसिएशन फुटबॉल मैदानाजवळील चाचलेल्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. जे डास उत्तीचे ठिकाणी बनले आहे. या परिसरात डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सरपंच सिक्वेरा यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.









