अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी सायंकाळपर्यंत जय किसान भाजी मार्केटला पूर्णपणे टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर बंदूक व चाकूचा धाक दाखविल्याचे समोर आले आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात आली. जोपर्यंत भाजी मार्केटला सील करत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन करत मंगळवार सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठाण मांडून बसले होते. जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतरही मार्केटमधील व्यापारी व व्यवस्थापन मंडळ आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरूच ठेवला आहे.
जर हे असेच सुरू राहिल्यास सरकारच्या आदेशालाच तिलांजली दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून जय किसान भाजी मार्केटमध्ये मनमानी कारभार सुरूच राहणार आहे. यासाठी त्वरित भाजी मार्केट सील करण्यात यावे. भाजी मार्केट व्यवस्थापन मंडळ व व्यापाऱ्यांनी कर्नाटक एपीएमसी कायदा 1966 च्या कलम 72 डी व कलम 78 चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने व कायद्याचे राज्य राखण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. परवाना रद्द केल्यानंतरही व्यापाऱ्यांनी पूर्वीप्रमाणे मुक्तपणे व्यापार सुरूच ठेवला आहे. यावरही आळा घालून मंगळवारी सायंकाळपर्यंत जय किसान भाजी मार्केटला टाळे ठोकण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. परवाना रद्दचा आदेश आल्यानंतर काही तासातच याची अंमलबजावणीसाठी प्रातांधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना केली आहे.
आदेशानंतर आपण स्वत: भाजी मार्केटला भेट देऊन आदेशाचे पालन करण्याची सूचना व्यापाऱ्यांना दिली होती. मात्र अद्याप मार्केटमध्ये भाजीपाला असल्याने आम्हाला काही दिवसांची मुदत देण्याची विनंती व्यापाऱ्यांनी केली होती. यानंतर त्यांना 48 तासांत आपले सर्व साहित्य हलविण्याची सक्त सूचनाही केली. जर कोणीही अधिकाऱ्यांना हत्यारांचा धाक दाखवून धमकी देत असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत जय किसान भाजी मार्केट सील करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांना दिले. आंदोलनावेळी झाडावर चढलेला एक शेतकरी अचानक झाडावरून खाली पडल्याने त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यावेळी चन्नप्पा पुजार, सुजित मुळगुंद, राजकुमार टोपण्णावर, अॅड. नितीन बोलबंडी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
रात्री साडे आठपर्यंत ठाण
सायंकाळी सातपर्यंत जय किसान भाजी मार्केट सील न केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रात्री साडे आठपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडले. तथापि, जय किसान भाजी मार्केट पूर्ण रिकामी करण्यासाठी काही कालावधी लागणार असे सांगण्यात आले. तसेच एकही गाडी जय किसानमध्ये जाणार नाही व बाहेर येणार नाही, अशी ग्वाही देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
शेतकऱ्यांनी एपीएमसीमध्येच भाजीपाल्याची विक्री करा,एपीएमसीच्या प्रशासक-कायदर्शींचे आवाहन
विविध कारणांमुळे कृषी पणन संचालकांनी जय किसान भाजी मार्केटचा व्यापार परवाना रद्द केला आहे. त्यामुळे खासगी भाजी मार्केटच्या जागेत व्यापार करणे बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यवहार करणे म्हणजे शिक्षेस पात्र आहे. त्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवहार (नियंत्रण आणि विकास) अधिनियम 1966 नुसार निर्बंध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंग्राळी रोडवरील एपीएमसी मार्केट यार्डमध्ये आपला भाजीपाला व शेती संबंधित उत्पादने विक्री करावीत, असे एपीएमसीचे प्रशासक व कार्यदर्शींनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.









