शत्रूच्या पाणबुड्यांची आता खैर नाही : ‘आयएनएस-गऊड’वर तैनात, भारतीय नौदलाची ताकद वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कोची
मल्टी-रोल हेलिकॉप्टर एमएच-60 रोमियो सीहॉकचा स्क्वॉड्रन बुधवार, 6 मार्च रोजी नौदलात सामील झाला आहे. ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची ही सागरी आवृत्ती आहे. सीहॉक्सला आयएनएस-334 म्हणून कार्यन्वित करण्यात आल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी बुधवारी जाहीर केले. सीहॉकमधील आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्स भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा गरजा पूर्ण करतील. सीहॉक्स हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनच्या समावेशामुळे नौदलाची लढाऊ क्षमता आणखी वाढली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत कोची येथील ‘आयएनएस गऊड’वर सीहॉक्स हेलिकॉप्टर स्क्वॉड्रनचा समावेश करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. पाणबुडीविरोधी युद्ध, शोध आणि बचावकार्यासाठी तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरचा समावेश हा भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध, शत्रूचा शोध व बचावकार्य आणि वैद्यकीय स्थलांतर यासह इतर मोहिमांसाठी डिझाईन केल्याचे नौदलाने सांगितले.
सीहॉक्स प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि एव्हियोनिक्स सूट्सने सुसज्ज आहेत. हिंद महासागर क्षेत्रात सीहॉक्सच्या तैनातीमुळे भारतीय नौदलाची सागरी क्षमता मजबूत होण्याबरोबरच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशात सुरक्षित वातावरण सुनिश्चित होईल. या रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत. याशिवाय त्यांच्या निर्यातीच्या गुणवत्तेनुसार बदल केले जातात. त्यांचा वापर पाळत ठेवणे, हेरगिरी, व्हीआयपी हालचाली, हल्ला, पाणबुड्या शोधणे आणि त्यांचा नाश करण्यासाठी केला जाणार आहे. तसेच इतर अनेक प्रकारच्या कामांसाठी वापरले जाऊ शकते. रोमियो हेलिकॉप्टरवर डझनभर सेन्सर्स आणि रडार बसवले आहेत. हे सेन्सर शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याची पूर्वकल्पना देतात. हे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी 3 ते 4 क्रू मेंबर्सची आवश्यकता असते. याशिवाय त्यात 5 जण बसू शकतात.
वैशिष्ट्यापूर्णता
►शस्त्रे, उपकरणे आणि सैन्यासह, त्याचे जास्तीत जास्त टेकऑफ वजन 10,433 किलो आहे. त्याची लांबी 64.8 फूट आणि उंची 17.23 फूट आहे. एमएच-60 मल्टी-रोल हेलिकॉप्टरमध्ये दोन जनरल इलेक्ट्रिक टर्बोशाफ्ट इंजिन असून ते टेकऑफच्या वेळी 1410×2 किलोवॅटची शक्ती निर्माण करतात.
►या हेलिकॉप्टरच्या मुख्य पंख्याचा व्यास 53.8 फूट आहे. हे रोमन हेलिकॉप्टर एकावेळी 830 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. तसेच जास्तीत जास्त 12 हजार फूट उंचीवर उ•ाण करू शकते. रोमियो हेलिकॉप्टर कमाल ताशी 270 किलोमीटर वेगाने उ•ाण करते. गरजेनुसार वेग 330 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकतो.
►भारताने फेब्रुवारी 2020 मध्ये 24 ‘एमएच-60आर’च्या खरेदीसाठी अमेरिकेसोबत करार केला होता. हिंद महासागर क्षेत्रात सीहॉक्सच्या तैनातीमुळे भारतीय नौदलाची सागरी उपस्थिती मजबूत होईल आणि संभाव्य धोके दूर होतील. ‘एमएच-60आर’ हेलिकॉप्टर भारताची ब्लू-वॉटर क्षमता वाढवेल आणि नौदलाच्या ऑपरेशनल क्षमतेचा विस्तार होणार आहे.









