गुहागर / सत्यवान घाडे :
तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांबरोबरच शहराला लाभलेल्या सहा किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण, स्वच्छ आणि सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर आता ‘सी प्रहरी’ इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू राहणार आहे. यामुळे गुहागरच्या पर्यटनाला पोलिसांचे सुरक्षा कवच प्राप्त झाले असून येथील पर्यटन अधिक सुरक्षित झाले आहे.
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर नगरपंचायतीच्यावतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर बंदर विभागाच्यावतीने दोन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांबरोबर गुहागर पोलीसही समुद्रकिनारी फेरफटका मारून सुरक्षेविषयी सर्वाधिक लक्ष घालत असतात. शहराला तब्बल सहा किलोमीटरचा विस्तीर्ण स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर अधिक सक्षमतेने लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा देण्याचे काम सुरक्षा रक्षक व पोलीस यंत्रणा करत आहे. अशातच गुहागर पोलीस ठाण्याकरता आलेल्या सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलमुळे समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सातकलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शहराच्या समुद्रकिनारी गस्तीकरीता दोन इलेक्ट्रिक सायकल गुहागर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या आहेत. या सायकल समुद्रकिनारच्या वाळूमधून सहज फिरू शकतात. यामुळे पोलिसांची समुद्रकिनाऱ्यावरील गस्त अधिक व्यापक बनली आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने सहा किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोलीस सहज पोहोचू शकतात. गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठी या इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू ठेवली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत कायम समुद्रकिनारी गस्त सुरू आहे. दररोज सुरू असलेल्या गस्तीबाबत रत्नागिरी अधीक्षक कार्यालयामध्ये नेंद होत आहे.








