जीआयटी उपविजेता, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र
बेळगाव : अंगडी महाविद्यालय आयोजित व्हिटीयु बेळगाव डिव्हीजन इंटरकॉलेज हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एसडीएमसीईटी धारवाड संघाने जीआयटी बेळगाव संघाचा 3-0 असा पराभव करुन व्हीटीयू चषक पटकाविला. हे दोन्ही संघ राज्यस्तरीय व्हीटीयू स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसएईएफचे अॅडमिनिस्ट्रेटर राजू जोशी, प्राचार्य डॉ. आनंद देशपांडे, जिमखाना चेअरमन किरण पोतदार, क्रीडा निर्देशक विशंत धमुने, सुधाकर चाळके, कॅप्टन उत्तम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्या उपांत्य सामन्यात जीआयटी संघाने एसजीबीआयटी संघाचा 1-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात एसडीएमसीईटी धारवाडने अंगडी संघाचा 5-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात एसडीएमसीईटी धारवाडने जीआयटी बेळगाव संघाचा 3-0 असा पराभव केला. धारवाडतर्फे पहिल्या सत्रात 14 व्या मिनिटाला अखिलेशने गोल केला. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला चंद्रुने तर 38 व्या मिनिटाला किरणने गोल करुन एसडीएमसीईटीने 3-0 ची आघाडी मिळविली. या सामन्यात जीआयटी संघाला गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, निवृत्त वैज्ञानिक व्ही. एच. महारेड्डी, जिमखाना चेअरमन डॉ. किरण पोतदार, क्रीडा निर्देशक विशंत धमुने यांच्या हस्ते विजेत्या एसडीएमसीईटी धारवाड व उपविजेत्या जीआयटी बेळगाव संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.









