उत्तरार्ध
समर्थ रामदासांची शिवथरघळ म्हणजे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुरेख संगमच. पुणे परिसरातील लेण्या, मुंबईचे एलिफंटा केव्ह आमच्यासाठी वाट बघतात. हे सगळं पाहताना या मूर्तींचे महात्म्य, शिल्पातील कारागिरी, त्या मागची भावना आणि अध्यात्म आम्हाला समजायला हवं. या मूर्तीचे रहस्य अनेक लोकांना माहितीच नसतं. ‘मूर्ती बघायची नसते तर मूर्तीतून बघायचं असतं’ असं अनेकदा संत सांगतात परंतु आम्हाला त्याचा नेमका अर्थ या शिल्पकारांकडूनच कळतो. प्रत्येक शिल्पातत्त्वविषयक सौंदर्यपूर्ण भाष्य केलेलं दिसतं आणि त्यासाठीच भारतीय शिल्पकारांनी प्रतीक मान्य केली आहेत. प्रतीक म्हणजे शिल्पकलेची खूण. साने गुरुजींनी या प्रतीकांमध्ये खोल अर्थ सांगितला आहे. भारतीय संस्कृतीने कोणतीही गोष्ट उगीचच स्वीकारलेली नाही. ही प्रतीकं पाहिल्यानंतर आमच्यामध्ये चैतन्यवृत्ती जाग्या होतात. मग गोपद्म असू दे किंवा स्वस्तिक शंखचक्र, पद्म, गदा असू दे त्या पाहिल्या की आम्ही मनोमन हात जोडतोच. या प्रत्येक प्रतीकांमध्ये आशयघनता असते. संस्कृतीच्या शास्त्रज्ञांनी अनुभवाची उत्तम शाश्वत ग्रंथ निर्मिती करून या प्रतीकांना शब्दबद्ध केले आणि आमच्यापर्यंत पोहोचवले. हे शब्द म्हणजे अणूरेणूसारखे तेजोगर्भ घेऊन मिरवणारे ग्रंथ ठरले आहेत. म्हणून शिल्प पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येतं की दगड आमच्याशी बोलतात, दगड हसतात, रडतात.. ही शिल्प म्हणजे संस्कृतीचे चालतेबोलते ग्रंथच आहेत. जे सामान्य माणसाच्या हृदयाला जाऊन भिडतात. भारतीय तत्त्वज्ञान शिल्पातून मनामनावर कोरलं गेलंय. म्हणूनच देवळात जायलाच हवं, मूर्तीतून अर्थ उघडायला. सामान्य माणसाला सहज तत्वज्ञान उलगडणारी आहेत. रांगोळ्या काढायला हव्या, बघायला हव्या आणि त्यातलं सौंदर्य पाहायला हवे. आजच्या युगात अशी शिल्पकला बघणं म्हणजे मनातील अस्वस्थता, असमाधान संपवण्याचा क्षण असतो. आमच्या आतला आवाज या बाह्य जगाच्या कोलाहलात आम्ही खरंतर घालवून बसलोय आणि म्हणूनच आमच्या अवतीभोवती असलेल्या या शिल्पातले सौंदर्य, नवनिर्मिती यांची ओढ वाढायला हवी. ही कला म्हणजे एक आध्यात्मिक साधन आहे, तो सौंदर्याचा योग आहे. ज्याच्या नशिबात तो आला त्याला अमृताचा स्पर्श लाभला असं समजायला हवं. शिल्पांमध्ये हे सौंदर्य जाणवतं कारण तिथे द्वंद संपलेलं असतं आणि कलाकार अद्वय अवस्थेला आलेला असतो. म्हणूनच कला म्हणजे विरोधाभासाचा तोल राखणारा उत्तम नमुना ठरतो. निर्गुणाला सगुण रूप देताना कलाकार हे सगळं त्याच्यामध्ये आणतो आणि प्रत्येक माणसाचा जगण्याकरता बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. जगताना जसं आपल्याला चांगले, वाईट, उत्तम, छान, अनुभव येत राहतात तसेच शिल्पकलेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आमचं सगळं भावविश्वच या शिल्पातून साकारलेलं असतं. म्हणूनच देवदेवता साकारताना राक्षससुद्धा साकारले जातात, चांगलं दाखवताना वाईटसुद्धा दाखवलं जातं. शिल्प बघतांना आम्ही स्वप्नाकडून वास्तवाकडे कधी जातो हे नेमकेपणाने ज्ञानदेव आम्हाला सांगतात …‘देव देऊळ परिवारु, अवघा कीजिए पोखरुनी डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहारू, का न व्हावा?








