आरोग्य विभाग-सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांकडे अर्ज छाननीची जबाबदारी : 100 जागांसाठी 841 अर्ज दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेतील स्वच्छता कामगारांच्या रिक्त जागा भरण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. 100 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविण्यात आले होते. याकरिता 841 स्वच्छता कामगारांनी महापालिका कार्यालयात अर्ज दाखल केले असून अर्जांची छाननी करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. त्यामुळे गुऊवारपासून अर्जांच्या छाननीस प्रारंभ करण्यात आला आहे.
यापूर्वी स्वच्छता कामगारांच्या 153 जागा भरण्यासाठी अर्ज घेण्यात आले होते. महापालिकेकडे 900 हून अधिक अर्ज कामगारांनी दिले आहेत. मात्र अर्जांची केवळ छाननी करण्यात आली आहे. आतापर्यंत चारवेळा अर्जांची छाननी करण्यात आली. पण 153 कामगारांच्या निवडीची यादी जाहीर करण्यात आली नाही. याच दरम्यान आता पुन्हा 100 रिक्त जागा भरून घेण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही अधिसूचना जारी करून अर्ज देण्याचे आवाहन स्वच्छता कामगारांना करण्यात आले. महापालिकेत 1099 स्वच्छता कामगार हंगामी तत्त्वावर कार्यरत आहेत. यापैकी 548 कामगारांना ऑनलाईन वेतन देण्यात येते. आता 100 जागांसाठी अर्ज मागविण्यात आल्याने एकूण 841 स्वच्छता कामगारांनी अर्ज सादर केले आहेत. यापैकी पात्र स्वच्छता कामगारांची निवड केली जाणार आहे.
153 कामगारांच्या निवडीची यादी प्रसिद्ध करा
सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना दुसरीकडे स्वच्छता कामगारांच्या अर्जांची छाननी करण्याचा आदेश महापालिका आयुक्त ऊद्रेश घाळी यांनी बजावला आहे. महापालिकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती अर्जांच्या छाननीसाठी करण्यात आली आहे. गुऊवारपासून अर्ज छाननीस प्रारंभ झाला आहे. आरोग्य विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांकडे अर्ज छाननीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 100 जागांसाठी नव्याने देण्यात आलेल्या अर्जांच्या छाननीस प्रारंभ करण्यात आला. मात्र यापूर्वी 153 जागांसाठी अर्ज केलेल्या स्वच्छता कामगारांच्या निवडीची यादी कधी जाहीर होणार? असा प्रश्न स्वच्छता कामगारांतून उपस्थित केला जात आहे. 153 स्वच्छता कामगारांच्या निवडीची यादी लवकरच प्रसिद्ध करावी, अशी मागणीही होत आहे.









