महामंडळाच्या दोन्ही गटाकडून छुप्या पध्दतीने प्रचार सुरू
कच्ची मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच येणार प्रचाराला रंगत
कोल्हापूर / अहिल्या परकाळे
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम धर्मदाय उपायुक्तांनी न्यायालयाला सादर केला असून त्यानुसार फेब्रुवारी 2023 ला निवडणूक होणार आहे. चित्रपट महामंडळाची निवडणूक जुन्या की नव्या राज्यघटनेनुसार होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी एकमेकांच्या विरोधात पॅनेल उभा करण्याचा निश्चय केला आहे. उघडपणे प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी निवडणूकीचा प्रचार छुप्या पध्दतीने सुरू असून ताकदीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. परंतू कच्ची मतदारांची यादी जेंव्हा जाहीर होईल, तेंव्हा मात्र निवडणूक प्रचाराला खरी रंगत येणार असल्याची चर्चा चित्रपट महामंडळाच्या सदस्यांमध्ये आहे.
चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा प्रचार गेल्या दोन वर्षापासून माजी संचालकांनीच एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करून सुरू केला आहे. माजी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्यातच लढत होणार असे सध्यातरी चित्र आहे. परंतू निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्न करीत आहेत. संबंधीताची भेट घेवून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. तसेच सध्या इच्छुकांसह मतदारांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्याबरोबर किती मतदार आहेत, याची चाचपणी दोन्ही गटांकडून सुरू आहे. या गोष्टी अत्यंत छुप्या पध्दतीने सुरू असल्या तरी मतदारांमध्ये चर्चा मात्र जोरदार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अद्याप धर्मदाय उपायुक्त कार्यालय काय निर्णय घेणार यावर पुढील गोष्ट अवलंबून आहेत. त्यामुळे आताच पैसे आणि वेळ का वाया न घालवता, मतदारांची कच्ची यादी जाहीर झाल्यावरच उघडपणे प्रचार करूया, अशी भुमिका दोन्ही गटांची आहे, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. हे खरे असले तरी न्यायालयाने कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे लिहून घेतल्याने कोणी उघडपणे बोलायला तयार नाही. परंतू छुप्या पध्दतीने दोन्ही गट एकमेकांच्या विरोधातील प्रचारात सक्रीय आहेत. चित्रपट महामंडळाची निवडणूक जुन्या की नव्या घटनेनुसार घ्यायची याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही स्विकृत संचालक म्हणून घेतो, आम्हाला पाठींबा द्या, असा प्रस्ताव इच्छुकांसमोर ठेवले जात आहेत. परंतू जुन्या घटनेनुसार निवडणूक झाली तर स्विप़ृत संचालक पदच या घटनेत अस्तित्वात नाही, ही दुसरी बाजू सांगणारी यंत्रणाही सक्रीय आहे. तसेच कोणत्या जिल्हय़ात किती मतदार आहेत, तेथील इच्छुकांबरोबर किती मतदार जावू शकतात, इच्छुक उमेदवारांचे राजकीय बळ किती आहे, याचा अभ्यास करूनच इच्छुकांना पॅनेलमध्ये घेण्याचा प्लॅन दोन्ही गटांचा आहे. चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी संपर्क साधला असता, न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिक्रिया देवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोणीही अमिषाला बळी पडू नये
चित्रपट महामंडळाचे सदस्य आणि इच्छुक उमेदवारांना विरोधकांकडून स्विकृत समस्य म्हणून घेतो, असे अमिष दाखवले जात आहे.जुन्या घटनेनुसार निवडणूका झाल्या तर या घटनेत स्विकृत सदस्य अशी तरतूद नाही. त्यामुळे कोणत्याही सदस्यांनी विरोधकांच्या अमिषाला बळी पडू नये.
धनाजी यमकर (माजी उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)









