चिपळूण :
पिंपळी येथील भंगारच्या गोडावूनला बुधवारी सकाळी 6.30 वाजता भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. गेल्या 10 दिवसात तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. मिरजोळी येथील गोडावूनला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा अद्याप ठरला नसल्याने पंचनाम्याचे काम बाकी आहे.
गेल्या काही वर्षापासून शहरासह तालुक्यातील मिरजोळी, पिंपळी आदी भागात मोठ्याप्रमाणात भंगार व्यवसाय वाढताना दिसत आहेत. यातील बहुतांशी गोडावून बेकायदेशीर असून ती सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू करण्यात आली आहेत. यामुळे परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यातच आता आगीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
10 दिवसांपूर्वी वणव्यामुळे मिरजोळी येथील भंगार गोडावूनमधील बारदाने, तेलाचे रिकामे डबे, बॅरल यांनी पेट घेतल्याने भीषण आग लागली. यामुळे निर्माण झालेली भीती कायम असतानाच बुधवारी पिंपळी येथे भंगार गोडावूनला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, परिसरात धुराचे लोळ पसरले होते. ती आग आटोक्यात आणण्यासाठी चिपळूण नगर परिषद, खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी व पोफळी येथील महाजनको यांचे बंब मागवण्यात आले. त्यांनी दोन तासांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण पुढे आलेले नाही. मात्र गोडावूनवरुन गेलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिन्यांमध्ये घर्षण झाल्याने पडलेल्या ठिणगीतून ही आग लागल्याची चर्चा सुरू आहे. तर वाहिन्यांखाली गोडावून कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
- पंचनामा नाकारला
आगीच्या भस्मस्थानी पडलेले भंगार गोडावून विजय इंदुलकर, संजय इंदुलकर यांचे आहे. घटनेनंतर महसूलची यंत्रणा येथे पंचनामा करण्यासाठी गेली होती. मात्र आम्हांला पंचनामा नको, असे इंदुलकर बंधूंनी त्यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होऊन त्यांनी पंचनामा का नाकारला, असा सवालही उपस्थित होत आहे.
- मिरजोळीतील घटनेचा ठरेना आकडा
गेल्या अनेक वर्षांपासून भानुशाली नामक व्यक्तीचे मिरजोळी येथे जंगल भागात गोडावून आहे. येथे कायम बारदाने, तेलाचे रिकामे डबे, बॅरल यासह अन्य साहित्याचा मोठा साठा असायचा. या गोडावूनलाही 10 दिवसांपूर्वी वणव्यामुळे आग लागली. त्यात मोठे नुकसान झाले. येथेही मिरजोळीचे तलाठी पंचनामा करण्यासाठी गेले असता धुमसत असलेल्या आगीचे कारण देत नंतर आम्ही नुकसानीची यादी देतो, असे सांगण्यात आले होते. मात्र ही यादीही अद्याप झाली नसल्याने पंचनामा रखडला आहे.








