सातारा :
सातारा तालुक्यातील चाहुर येथे मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भंगारच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, नेहमीप्रमाणे सातारा पालिकेचा अग्निशामक दलाचा बंब तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने भंगाराच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या परिसरातील काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
सातारा शहराला लागूनच चाहुर येथे भंगार दुकान आहे. त्या भंगारच्या दुकानाला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीने बघता बघता क्षणात रौद्र रुप धारण केले. आगीच्या ज्वालांनी पूर्णपणे भंगाराच्या दुकानाला वेढले होते. काही कळायच्या आत आगीमध्ये भंगारचे दुकान सापडले. त्यामुळे त्या परिसरातील स्थानिक नागरिक, दुकानाचे मालकांनी अग्निशामक दलास याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे पथक नेहमीप्रमाणे तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आगीने दुकान भस्मसात केले. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या तीन बंबाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. या आगीमुळे नजीकच उभ्या असलेल्या डंपरच्या टायरलाही हानी पोहोचली. तसेच आगीमुळे सेवा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.








