आयुक्त पी.जी.आर. सिंधिया यांचे प्रतिपादन
बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्याबरोबरच साहित्य, संस्कृती, कला यांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन उत्तम नागरिक निर्माण होतात, असे भारत स्काऊट आणि गाईड्सचे राज्य मुख्य आयुक्त पी. जी. आर. सिंधिया यांनी सांगितले. शालेय शिक्षण खाते उपसंचालक खाते बेळगाव आणि शैक्षणिक जिल्हा चिकोडी जैन हेरिटेज शाळा, भारत स्काऊट आणि गाईड्स कर्नाटक व जिल्हा संस्था बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जानपद तज्ञ नाडोज पुरस्कार पुरस्कृत चन्नबसव आणि जिल्हास्तरीग गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन करून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी धारवाड अप्पर आयुक्त कार्यालयाचे साहाय्यक संचालक आणि भारत स्काऊट आणि गाईड्सचे राज्य उपाध्यक्ष गजानन मण्णिकेरी होते. ते म्हणाले, स्काऊटमुळे देशाभिमान विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यास मदत होते. शिक्षक विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला शिकवितात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्काऊट गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण खात्याचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी विद्यार्थ्यांनी स्काऊटमध्ये भाग घ्यावा, एकमेकांशी विश्वासाने रहावे, एकमेकांचा परिचय करून घ्यावा. यामुळे बंधुभाव वाढण्यास मदत होते, असे सांगितले. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्काऊट आणि गाईड्सचे मार्गदर्शक उपस्थित होते. जैन हेरिटेजच्या संचालिका श्रद्धा के., सौंदत्ती बीईओ व जिल्हा आयुक्त एम. एन. दंडीन, शहर बीईओ लिलावती हिरेमठ यांची भाषणे झाली. गीतगायनमध्ये अमित कुलकर्णी, विशाखा देशपांडे, श्रेया देशपांडे, मंजुळा मोडवर, अन्नपूर्णा कुरबेट, पल्लवी नाडकर्णी यांचा सहभाग होता. यावेळी हुक्केरी बीईओ प्रभावती पाटील यांनी स्वागत, बी. बी. अत्तार यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल एस. बी. यांनी आभार मानले.









