पुणे / प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवायला हवी. व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासगी शाळांच्या वाढत्या मक्तेदारी विषयी बोलताना ते म्हणाले, खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात पालकांना आर्थिक दृष्टय़ा सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये. यावेळी ‘नर्सरी’ शाळांना सरकारी परवानगी आणि नियमणासाठी कडक निर्बंध लादू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला जेवढी शिस्त लावता येईल, तेवढा प्रयत्न आम्ही करत आहोत. नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस आधीचा गणवेश आणि तीन दिवस आताचा नवा गणवेश असेल, असेही त्यांनी सांगितले.