450 हून अधिक शिक्षक-प्राध्यापकांची उपस्थिती
बेळगाव : विद्यार्थ्यांची बौद्धिक पात्रता वाढत असल्याने त्यांना गुणात्मक शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची मोठी भूमिका असते. कर्नाटक राज्याने शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संत बसवेश्वरांच्या समता, बंधुता या मूल्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना घडविले जात आहे, असे मत माजी मंत्री पी. जी. आर. सिंदिया यांनी व्यक्त केले. स्काऊट गाईड आणि रोव्हर रेंजर प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहआयुक्त गजानन मण्णीकेरी, सेंट अँथनी हायस्कूलच्या प्राचार्या अन्नपूर्णा कुरबेट, भारती पाटील, निलेश शिंदेसह इतर उपस्थित होते.
कार्यशाळेचे महत्त्व दिले पटवून
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. सहआयुक्त गजानन मण्णीकेरी यांनी स्काऊट गाईड व रोव्हर रेंजर कार्यशाळेचे महत्त्व पटवून दिले. बेळगाव विभागातील नऊ जिल्ह्यांमधील शिक्षक व पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. 450 हून अधिक शिक्षक व प्राध्यापकांनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती दर्शविली. स्काऊट व गाईडची ध्येयधोरणे शिक्षकांपर्यंत पोहोचावीत, यासाठीचा हा प्रयत्न होता. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठल बाचगोडी, श्रीधर हिरेमठ, एम. के. उप्पीन, श्रीधर पाटील, अजित पाटील, नारायण पाटील, उदय पाटील, के. एल. शिंदेसह प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले. डी. बी. अत्तार यांनी आभार मानले.









