वृत्तसंस्था/ बुलावायो
2023 च्या आयसीसीच्या भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रतेसाठी सुरू असलेल्या पात्र सुपर 6 फेरीतील 26 व्या सामन्यात मंगळवारी स्कॉटलंडने यजमान झिंबाब्वेचा 31 धावांनी पराभव केला. या सामन्यात स्काटलंडच्या ख्रिस सोल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या सामन्यात 33 धावात 3 गडी बाद केले.
या सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली. स्कॉटलंडने 50 षटकात 8 बाद 234 धावा जमवल्या. त्यानंतर झिंबाब्वेचा डाव 41.1 षटकात 203 धावात आटोपला. स्कॉटलंडच्या डावामध्ये सलामीच्या मॅकब्रिडेने 45 चेंडूत 2 चौकारासह 28, मॅथ्यू क्रॉसने 2 चौकारासह 38, मॅकमुलेनने 34 चेंडूत 6 चौकारासह 34, मुनसेने 2 चौकारासह 31,
मॅकिनटोशने 1 चौकारासह 13 तर मिचेल लिसेकने 34 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 48 तसेच मार्क वॅटने 15 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 21 धावा जमवल्या. मॅकब्रिडे आणि क्रॉस या सलामीच्या जोडीने 56 धावांची भागीदारी केली. मॅकब्रिडे बाद झाल्यानंतर क्रॉस आणि मॅकमुलेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली. स्कॉटलंडच्या डावात 2 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. झिंबाब्वेतर्फे विलियम्सने 3, तेंदाय छताराने 2 तर निगरेव्हाने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेच्या डावात रेयान बर्लने एकाकी लढत देत 84 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 83, सिकंदर रझाने 40 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 34, मधेवेरेने 39 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 40, विलियम्सने 1 चौकारासह 12 तर केयाने 2 चौकारासह 12 धावा जमवल्या. झिंबाब्वेचा निम्मा संघ 91 धावात तंबूत परतला होता. सिकंदर रझा आणि बर्ल यांनी पाचव्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. रझा बाद झाल्यानंतर बर्लने मधेवेरेसमवेत सहाव्या गड्यासाठी 73 धावांची भर घातली. झिंबाब्वेच्या डावात 3 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. स्कॉटलंडतर्फे ख्रिस सोलने 33 धावात 3, मॅकमुलेनने 31 धावात 2, लिसेकने 33 धावात 2 तसेच शरीफ, वॅट आणि ग्रिवेस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : स्कॉटलंड 50 षटकात 8 बाद 234 (लिसेक 48, मॅकमुलेन 34, क्रॉस 38, मॅकब्रिडे 28, मुनसे 31, वॅट नाबाद 21, विलियम्स 3-41, छतारा 2-46), झिंबाब्वे 41.1 षटकात सर्वबाद 203 (बर्ल 83, मधेवेरे 40, सिकंदर रझा 34, विलियम्स 12, केया 12, सोल 3-33, मॅकमुलेन 2-31, लिसेक 2-33, शरीफ, वॅट, ग्रीवेस प्रत्येकी एक बळी).









