वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वर्षाच्या आधारावर पाहता चीनमधून सौर मॉड्युलची आयात 2022 च्या सहा महिन्याच्या तुलनेमध्ये यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये लक्षणीयरित्या घटली असल्याचे दिसून आले आहे. हे घटीचे प्रमाण 76 टक्के इतके नोंदले आहे. या काळात भारतातच देशांतर्गत पातळीवर सौर ऊर्जा उत्पादनावर भर दिल्याचे पहायला मिळते आहे.
2022 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 9.8 गिगावॅट इतकी आयात करण्यात आली होती तर हेच आयातीचे प्रमाण 2023 पहिल्या सहा महिन्यांमध्ये 2.3 मेगा गिगावॅट इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ चीनमधून पहिल्या सहा महिन्यांमध्ये सौर मॉड्युलच्या आयातीमध्ये 76 टक्के इतकी विक्रमी घट दिसून आली आहे.
भारताचं यश मोठं
एका अहवालानुसार मिळालेली माहिती अशी की सौर ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारच्या प्रयत्नांना उद्योजकांनी हातभार लावला असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. 2022 च्या आधीपर्यंत भारत हा सौर ऊर्जा उत्पादनांच्या बाबती आयातीसाठी चीनवरच अधिक करून अवलंबून राहात होता. परंतु 2022 पासून भारताने आपल्या या भूमिकेमध्ये बदल केला. एप्रिल 2022 पासून सौर मॉड्युलवर 40 टक्के व सौर सेलवर 25 टक्के इतके सीमा शुल्क सरकारने लागू केले होते.









