डिजिटल पद्धतीने सहभागी होणार सदस्य देश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 4 जुलै रोजी डिजिटल पद्धतीने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. सदस्य देशांसोबत विचारविनिमय केल्यावर डिजिटल पद्धतीने ही शिखर परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाने दिली आहे.
मागील वर्षी उझ्बेकिस्तानच्या समरकंद शहरात एससीओ परिषद पार पडली होती, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन समवेत सदस्य देशांचे प्रमुख सामील झाले होते.
भारत सप्टेंबर महिन्यात जी-20 ची शिखर परिषद आयोजित करणार असून याकरता चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना आमंत्रित केले जाणार आहे. भारताने मागील वर्षी 16 सप्टेंबर रोजी समरकंद येथील शिखर परिषदेत एससीओचे अध्यक्षत्व स्वीकारले होते.
भारताच्या अध्यक्षतेत एससीओची 22 वी शिखर परिषद डिजिटल पद्धतीने 4 जुलै रोजी पार पडणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी गोव्यामध्ये एससीओच्या विदेश मंत्र्यांची परिषद पार पडली होती.
4 जुलै रोजीच्या शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी एससीओचे सर्व सदस्य देश चीन, रशिया, कजाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझ्बेकिस्तानला आमंत्रित करण्यात आले आहे. इराण, बेलारुसा आणि मंगोलियाला पर्यवेत्रक देशांच्या स्वरुपात आमंत्रित करण्यात आले आहे. एससीओच्या परंपरेनुसार तुर्कमेनिस्तानाला अतिथी देशाच्या स्वरुपात आमंत्रित करण्यात आल्याचे विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.
6 आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांच्या प्रमुखांना देखील शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या संघटनांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ, आसियान, सीआयएस, सीएसटीओ, ईएईयू आणि सीआयसीए सामील आहे. भारताने स्वत:च्या अध्यक्षत्वाच्या अंतर्गत स्टार्टअप, नवोन्मेष, पारंपरिक औषध, डिजिटल समावेशकता, युवा सशक्तीकरण आणि संयुक्त बौद्ध वारसा असे सहकार्याचे नवे स्तंभ प्रस्थापित केल्याचे वक्तव्य विदेश मंत्रालयाने केले आहे.