भारताचे मोठे यश, भारत-चीन-रशिया दिसले एक, पाकिस्तान अलग, पंतप्रधान मोदी-पुतिन गुप्त चर्चा
वृत्तसंस्था / तियानजिन (चीन)
चीनमधील तियानजिन येथे पार पडलेल्या दोन दिवशीय ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या शिखर परिषदेत दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेला मोठे यश प्राप्त झाले आहे. या परिषदेत पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण आणि धर्मांध दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या संघटनेने दहशतवादाविरोधात प्रथमच इतकी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या परिषदेत भारत, चीन आणि रशिया एकत्र आल्याचे आणि पाकिस्तान एकाकी पडल्याचे पहावयास मिळाले. भू-राजकीय समीरकणांमधील परिवर्तन या परिषदेतून स्पष्ट होत असल्याचे जाणवत आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी, या परिषदेच्या अखेरच्या दिवशी, संमत करण्यात आलेल्या घोषणापत्रात दहशतवादाचा कठोर शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे. या संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी दहशतवादाविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार स्पष्ट शब्दांमध्ये प्रदर्शित केला. दहशतवाद आणि अतिरेकाची निंदा करण्यात आली. तसेच, दहशतवाद, अतिरेकवाद आणि अतिरेकी गट यांचा धोरणात्मक उपयोग करणाऱ्यांना इशारा देण्यात आला. या घोषणापत्रात पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नसला, तरी त्याचा रोख त्याच देशावर आहे, हे स्पष्ट झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे, या संयुक्त घोषणापत्रात सार्वभौम देश आणि त्यांची अधिकृत प्रशासने यांना दहशतवाद तसेच दहशतवादी धमक्या यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचा अधिकार असल्याचेही मान्य करण्यात आले आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात केलेल्या कार्यवाहीला या संघटनेकडून हे अप्रत्यक्षपणे समर्थनच मिळाले आहे, असा अर्थ काढला जात आहे.
कोणत्याही कारणांसाठी दहशतवाद घातकच
कोणत्याही कारणांसाठी आणि कोणत्याही निमित्ताने करण्यात येणार दहशतवाद हा निषेधार्हच आहे. तसेच, दहशतवादाविरोधात संघर्ष करताना दुहेरी आणि विसंगत भूमिका घेणे, तसेच पक्षपाती धोरण स्वीकारणे या संघटनेला अमान्य आहे, असेही या घोषणापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. आत्तापर्यंत कधीही अशा प्रकारचा स्पष्ट दहशतवादविरोध या संघटनेने दर्शविला नव्हता. भारताने अनेकदा अशा शब्दांमधील प्रस्ताव या संघटनेत मांडण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, प्रत्येकवेळी चीनने अप्रत्यरित्या पाकिस्तानची बाजू सारवण्यासाठी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नव्हता. संघटनेच्या या परिषदेत मात्र, हे घडल्याने आणि त्याला चीनचेही समर्थन मिळाल्याने पाकिस्ताची धास्ती वाढल्याचे दिसून येत आहे.
वाढले भारताचे महत्व
या संघटनेने प्रथमच भारताचे महत्व मान्य केल्याचे पहावयास मिळत आहे. पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध आणि नि:शस्त्र नागरीकांना, तसेच त्यांच्या कुटुंबियांना परिषदेत सहानुभूती व्यक्त करण्यात आली. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात केलेल्या कृतीचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले. तसेच या हल्ल्याचे जे सूत्रधार आहेत, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाजे आणि त्यांना त्यांच्या कृतीची शिक्षा मिळाली पाहिजे, असेही या घोषणापत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याने भारताची मागणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे. या संघटनेने आता भारताची भूमिका गांभीर्याने घेतली असून त्यामुळे भारताचे संघटनेतील महत्व वाढल्याचीच ही प्रचीती आहे, असे तज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. या शुल्काचा निषेध रशियासह चीननेही केलेला आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद होती. भारत कोणती भूमिका घेणार, याकडे औत्सुक्याने पाहिले जात होते. अमेरिकेने उभ्या केलेल्या आव्हानासंबंधी भारत काय करणार, हा प्रश्नही होता. भारताने या परिषदेत ठाम पण समतोल भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान मोदी-अध्यक्ष पुतिन गुप्त चर्चा
या परिषदेच्या कालावधीत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पुतिन यांच्या कारमध्ये झालेली 45 मिनिटांची गुप्त चर्चा हा बरीच खळबळ उडविणारा विषय ठरला आहे. अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतीक्षा केली. नंतर पुतीन यांनी रशियाहून स्वत:साठी आणलेल्या कारमधून दोन्ही नेत्यांनी जवळपास 45 मिनिटे फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यात कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही. तथापि, अशा प्रकारे झालेल्या या चर्चेची चर्चा मात्र आता जगात होताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांनी कदाचित पुढच्या एकत्रित धोरणाविषयी बोलणी केली असण्याची शक्यता आहे, असा तर्क राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केला आहे .
तीन नेते एकत्र, एक एकाकी
या पूर्ण परिषद काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकत्र दिसून आले आहेत. त्यांनी एकत्र केलेली चर्चा. त्यांची एकत्रित हस्तांदोलने आणि गळाभेटी यांची आता जगात चर्चा होत आहे. तथापि, पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ हे मात्र, या संघटनेत प्रथमच एकाकी पडल्याचेही दृष्य दिसले. शरीफ यांनी पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी काहीकाळ त्यांच्यामागे धावाधाव केली. तथापि, त्यांना यश आले नाही. आता यासाठी शरीफ पाकिस्तानात टीकेचे लक्ष्य बनले आहेत. तसेस, दहशतवादाच्या मुद्द्यावर रशिया आणि चीन यांनी उघडपणे भारताची पाठराखण केल्याने शरीफ यांची चांगलीच कोंडी झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ही परिषद पाकिस्तानसाठी जागतिक अवमानना ठरल्याचेही बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदी, अध्यक्ष जिनपिंग चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात साधारणत: एक तासभर, या परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी शांतता आणि सीमेसंबंधी प्रश्नांवर चर्चा केल्याचे समजते. सध्याच्या वेगाने परिवर्तीत होणाऱ्या परिस्थिती दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे, असे सुतोवाच अध्यक्ष जिनपिंग यांनी रविवारीच केले होते. त्यामुळे, भारत आणि चीन यांच्यात सामोपचाराच्या प्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे, असे मानण्यात येत आहे.
भारताची ठाम भूमिका
भारताने या परिषदेत आपल्या ठाम भूमिकेचे दर्शन घडविले आहे. दहशतवाद आणि आर्थिक सहकार्यासंबंधात भारताने मांडलेल्या मतांना परिषदेने अत्याधिक महत्व दिले आहे. याचे प्रतिबिंब परिषदेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या घोषणापत्रातून दिसून येत आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत भारत, चीन आणि रशिया यांनी एकत्र काम करण्याचा, तसेच भारत आणि चीनने एकमेकांमधील मतभेद सौम्य करुन सहकार्यावर भर देण्याचा निर्णय घेतल्याचेही संकेत आहेत.
परिषद यशस्वी…
ही परिषद अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेची समाप्ती झाल्यानंतर दिला आहे. या परिषदेतील अनेक महत्वाच्या नेत्यांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळाली. भारताने सर्व प्रश्न आणि मुद्द्यांवरील भूमिका स्पष्टपणे मांडली. सर्वांचा पाठिंबा मिळाला, अशी स्पष्टोक्ती संदेशात आहे.
युद्ध थांबावे, ही मानवतेची इच्छा…
युव्रेन आणि रशिया युद्ध थांबावे, ही मानवतेची इच्छा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी आता अमेरिकेचा नव्हे, तर भारताचा पुढाकार असेल, असे अमेरिकेतील काही विचारवंतांनाही वाटत आहे. एकंदर, भारताने अमेरिकेचा शुल्क दबाव असतानाही परिषदेत स्पृहणीय कामगिरी केली, अशी चर्चा आहे.
पालटणाऱ्या समीकरणांची नांदी…
ड एसीओ परिषदेत आली पालटणाऱ्या भूराजकीय समीकरणांची स्पष्ट प्रचीती
ड दहशतवादाविरोधात कोणतेही निमित्त न सांगता संघर्ष करण्यासाठी सहमती
ड भारत आणि चीन यांच्यात सहकार्य वाढीला लागण्याची दिसू लागली चिन्हे









