खाद्याच्या किमतीत वाढ : निधीची चणचण : अंगणवाड्यांना अपुरा धान्यपुरवठा
बेळगाव : कडधान्य, डाळी, भाजीपाला दरवाढीमुळे अंगणवाडी बालकांना केल्या जाणाऱ्या पोषण आहार पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. पुरेसा आहार पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बालकांना पुरेशा पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये मागील आठवडाभरापासून पुरेसा पोषण आहार मिळत नसल्याने महिला व बालकल्याण खाते अडचणीत आले आहेत. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे. यासाठी पोषण अभियानांतर्गत आहार दिला जातो. या योजनेंतर्गत प्रति बालकांवर 8 ते 12 रुपये खर्च केला जातो. मात्र दरवाढीमुळे एवढ्या पैशातून पौष्टिक आहार पुरविणे कठीण होऊ लागले आहे. बालकांना पुलावा, शेंगाची चिक्की, फळे, अंडी असा पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे. मात्र आहार पोषणासाठी निधीची चणचण जाणवत असल्याने पुरेसा आहार पुरविण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, शासनाकडूनदेखील वेळेवर अनुदान मिळत नसल्याने पुरवठ्यात विलंब होऊ लागला आहे. अंगणवाडी बालकांना दूध पावडरही उपलब्ध नाही. गेल्या नोव्हेंबरपासून केएमएफकडून दूध पावडरचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सर्व अंगणवाड्यांना वेळेत आहार पुरवठा करणार…
अंगणवाड्यातून पुरवठा करण्यात येणारा आहार व इतर खर्चासाठी निधीची कमतरता आहे. शासनाकडे वेळेत अनुदानासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. सर्व अंगणवाड्यांना वेळेत आहार पुरवठा केला जाणार आहे.
– नागराज आर. (महिला व बालकल्याण खाते, सहसंचालक)









