“घडय़ाळाच्या तास आणि मिनिट काटय़ामध्ये शून्य कोन किती वाजता होतो?’’
“बारा वाजता’’
“त्यानंतर पुन्हा किती वेळाने शून्य कोन होतो?’’
“हे आम्हाला शाळेत शिकवलेलं नाही!’’ असं उत्तर देण्यापेक्षा जरा डोके चालवून “एक वाजून पाच मिनिटांनी’’ असे उत्तर देण्याला फक्त गणित येऊन चालत नाही. त्यासाठी चिकित्सक वृत्ती असावी लागते.
“आकाशात चंद्र किती असतात?’’
“एक’’ असे उत्तर देणारे बरेच असतील पण एखाद्या मुलीने प्रतिप्रश्न केला, “पृथ्वीचे चंद्र की सूर्यमालेतील एकूण चंद्र?’’ तर त्या मुलीकडे प्रश्न विचारण्याची क्षमता आहे आणि ती विज्ञानाची खरी विद्यार्थिनी होऊ शकते. कारण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आकाशात अनेक ग्रह आहेत त्यापैकी मंगळाला दोन, गुरूला 80, शनीला 83, युरेनसला 27 आणि नेपच्यूनला 14 चंद्र आहेत. टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये अभिनेता एखादे तेल डोक्मयाला लावल्यानंतर डोके शांत राहते, वगैरे सांगतो.
एखादी अभिनेत्री सांगते की अमुक एक तेल लावल्यामुळे माझे केस काळेभोर झाले. आपणही लगेच ते तेल लावून बघतो पण त्याचा उपयोग न झाल्यामुळे आपलेच डोके भणभणते. ‘क्मया आपके टूथपेस्ट में नमक है?’ असा प्रश्न कोणी पांढरा कोट घालून विचारला की आपल्याला वाटते की प्रश्न विचारणारा / विचारणारी डॉक्टर आहे. भूक लागल्यावर आपण दोन मिनिटात होणाऱया नुडल्स करायला जातो तेव्हा दोन मिनिटात काहीच होऊ शकत नाही, हे आपल्या लक्षात येते. याचे कारण आपण भारावून जातो, डोक्मयास फार तोशीस लागू देत नाही. याचे कारण आपल्यामध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव. पालकांमध्ये असा दृष्टीकोन असेल तर पुढच्या पिढीमध्ये तो नक्कीच उतरतो.
वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून बघणे, खात्री करून घेणे. आज आपण सोशल मीडियावर काहीही येत असते, कोणीही कसलेही उपाय औषधी आहेत असे सुचवत असतात. अशा पोस्ट शिकले-सवरलेले लोक कोणताही विचार न करता पुढे दहा जणांना पाठवतात. त्यामुळे कोणीही काही सांगितले असले, पूर्वापार चालत असले, ‘आपल्या लोकांत तशी परंपरा असली’ तरीही त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी. प्रत्येक घरामध्ये प्रेशर कुकर वापरला जातो परंतु डाळ-भात शिजवायला किती वेळ लागतो असा विचार न करता तीन शिट्टय़ा झाल्यावर बंद करण्याची प्रथा सुरु राहते. किती शिट्टय़ा झाल्या यावर आपण भात शिजला असेल की नाही याचे अनुमान काढतो याचे कारण आपण शिट्टय़ा आणि शिजणे याचे गणित घालतो. खरे तर प्रेशर कुकर याचा अर्थ हवेच्या दबावाने डाळ-भात शिजवणे. शिट्टी होणे याचा अर्थ प्रेशर जास्त झाले आहे. म्हणूनच शिट्टी होण्यापूर्वी गॅस बारीक करून ठेवणे आणि मंद गॅसवर कुकर काही वेळ ठेवल्यास आतले जिन्नस उत्तमरीत्या वाफेवर शिजवता येतात.
वैज्ञानिक दृष्टीकोन कोणत्या प्रयोगशाळेत शिकवला जात नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक कृती करताना त्यामागचा विचार समजून घेणे आणि त्यावर पुन्हा विचार करण्याची सवय लावणे आपल्या हातात असते. लहान मुलांना एक ग्लास भरून दुध सकाळी दिल्यानंतर त्यांची न्याहरी होऊ शकत नाही आणि पालक मुलांच्या जेवणाविषयी तक्रार करतात. यावर उपाय हाच की, रोज दुध पिण्याचे बंधन काढून टाकावे. दिवसभरात एक ग्लास दुध पिणे आवश्यक आहे, एवढे पालक ठरवू शकतात. दुधाची साय काढून त्याखालचे दुध कितीही पिण्यास दिले तरी त्याचा फार उपयोग होत नाही. मोठी माणसे चहा पितात परंतु आम्हाला ग्लास भरून दुध प्यायला लावतात, ही त्यांची तक्रार बरोबर असते. त्यावर उपाय म्हणून पूर्ण दुधाचा चहा लहान मुलांना देता येईल.
‘चॉकलेट खाल्ल्याने दात किडतात’ ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे चॉकलेटवर बंदी घालण्यापेक्षा चॉकलेट किंवा सफरचंद खाल्ल्यावर लगेच दात घासण्याचे आणि पाच चुळा भरण्याचे बंधन घातल्यास हेतू साध्य होतो आणि दात घासण्याचे लॉजिक मुलांना समजते. कापलेले सफरचंद अर्धा तास उघडय़ावर ठेवून त्याचा रंग कसा बदलतो, हे मुलांना दाखवल्यास त्यांची खात्री पटेल. निरीक्षण करण्याची सवय मुलांना लावल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. दही लावण्याची प्रक्रिया त्यातले विज्ञान समजून घेतल्यास समजू शकते आणि हिवाळय़ात कोमट दुध वापरल्यास आठ तासात दही लागू शकते, यातला कार्यकारणभाव लक्षात येतो. निरीक्षणानंतर वर्गीकरण समजून घेण्यासाठी दही आणि पनीर यामधला फरक आपण मुलांना समजावून सांगितला तर विरजण लावणे आणि दुध फाटणे यातला फरक मुले कृतीमधून समजावून घेतील. तसेच उत्तम जमलेल्या दह्यात बॅक्टेरिया आहेत हे मुले ओळखू शकतील. अर्थात पुढच्या इयत्तेमध्ये गेल्यावर “बॅक्टेरिया व्हेज की नॉनव्हेज?’’ अशा मुलांच्या प्रश्नाला तोंड देण्याची पालकांनी तयारी ठेवावी.
‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ असे वाकप्रचार कानावर पडल्यामुळे कुतूहल थांबते. नारळात पाणी का असते, नारळात पाणी असल्याची खातरजमा कशी करतात, जास्त पाणी असलेल्या शहाळय़ात ‘मलई’ कमी का असते, अशा प्रश्नांची उत्तरे शोधून चौकसबुद्धी विकसित होत असते. निसर्गापुढे नतमस्तक व्हायचे की उत्सुकतेने त्याचा अभ्यास करायचा? नतमस्तक झाल्यावर डोके चालवणे बंद होत असते. ‘याच पक्षाची चोच इतकी धारदार का?’ या प्रश्नाचे उत्तर त्या पक्षाच्या आहार पद्धतीमध्ये आहे. प्राण्याचे वर्गीकरण हा धडा विज्ञानाच्या पुस्तकात आहे. ते वर्गीकरण पाठ करण्यापेक्षा आणखी वेगळय़ा पद्धतीने वर्गीकरण कसे करता येईल, याचा विचार केल्यास जीवशास्त्र विषयातील गोडी वाढेल. वाघ गुहेत राहतो, असे इसापनीतीच्या गोष्टीत वाचलेले असते. त्यावर वाघ खरंच गुहेत राहतो का, असा प्रश्न पडणे, हे चिकित्सक असण्याचे लक्षण आहे. सहा एकसारख्या कपामध्ये पाणी कमी-जास्त घालून त्यावर चमच्याने हलका आघात केल्यास ऐकू येणाऱया आवाजात काय फरक आहे, हे मुलांनी पडताळून बघावे. विश्लेषण करता येणे हे विज्ञानाची आवड असल्याचे लक्षण आहे.
विज्ञानाचा विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘स्टेप बाय स्टेप’ विचार मांडून देण्याचा प्रयत्न करतात. दहावीमध्ये नव्वद टक्के मार्क पडले म्हणून मी ‘सायन्सला गेलो’ हे वाक्मय म्हणूनच विनोदी आहे. रोजच्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोन नसेल, शोधक वृत्ती नसेल, चिकित्सक वृत्ती नसेल, ‘हे असेच का, ते तसेच का’ असे प्रश्न विचारण्याची सवय नसेल तर आपला पाल्य विज्ञान शाखेचा विद्यार्थी होऊ शकत नाही.
ब्राऊन ब्रेड म्हणजे पौष्टिक असे गृहीत धरणे किंवा तो मैद्याऐवजी गव्हाच्या पिठानेच तयार केला आहे हा समज करून घेणे, ही अंधश्रद्धा आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी ब्रेडच्या वेष्टनावर लिहिलेला मजकूर वाचणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे मैदा कसा तयार करतात याची माहिती घेणे, ही त्याच्या पुढची पायरी झाली. ‘बिस्लेरी बाटली द्या’ असे सांगितल्यावर दुकानदार जी बाटली देतो ती बिस्लेरी कंपनीचीच आहे का, याची बाटलीवरचा मजकूर वाचून खातरजमा करायला हवी. म्हणूनच तर वैज्ञानिक दृष्टीकोन तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग असतो.
– सुहास किर्लोस्कर








