नागपूर
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणाव वाढला आहे. परिणामी नागपूरमधील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दृष्टीने सुट्टी जाहीर केली. नागपूर जिल्हा प्रशासनाने शाळांना स्वातंत्र्य दिले असून, त्यांनी परिस्थितीनुसार स्वतःचा निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
सोमवारी महाल परिसरात विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ औरंगजेबाचा पुतळा जाळला. या सगळ्या प्रकारावर मुस्लिम संघटनांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला.
सायंकाळी ७ च्या सुमारास नागपूर येथील शिवाजी चौक येथे दोन गट आमनेसामने आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु झाला. चिटीनीस पार्क आणि भालदारपुरा या भागात वाहनांची जाळपोळ झाली. पोलिसांवरही हल्ले झाले. या घटनेमध्ये ११ जण जखमी झाले असून यामघ्ये पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव नागपूरमधील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पचपावली, शांतीनगर, सक्करदारा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपिलनगर येथे कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या घटनेत हिंसेत सामील असलेल्या ५० हुन अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस दल आणि दंगा नियंत्रण पथक परिसरात तैनात करण्यात आले आहे.
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, नागपूर हे शांतिप्रिय शहर असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असा संदेशही दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगदेबाचे समर्थन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रित झाली असली तरी तणाव कायम आहे. प्रशासनाचेही नागपूरातील परिस्थितीवर लक्ष आहे. दंगलीतील सुत्रधारांवर कडक कारवाई केली जाणार असून, नागपूरकरांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








