कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत शैक्षणिक सहलींनी कोल्हापूर शहर आणि जिल्हा गजबजून गेला होता. सहलींच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा अधिक वापर झाला आहे. कोल्हापूर विभागातील 1922 बसेसचा शैक्षणिक सहलीसाठी वापर करण्यात आला आहे. या सहलीतून कोल्हापूर विभागाला सुमारे 7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
दिवाळीच्या सुटीत आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपर्यंत शैक्षणिक सहली सुरु असतात. शाळा– कॉलेजचे विद्यार्थी सहलीच्या माध्यमातून पर्यटनस्थळांना भेट देतात. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक स्थळांना भेट देवून तेथील माहिती घेतात. ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानांमध्ये भर पडते. यामुळे विद्यार्थ्यांना या सहलींचा फायदा होतो.
शालेय सहलीसाठी शासनाकडून एसटीच्या दरात 50 टक्के सवलत आहे. एसटीच्या या सवलतीच्या दराचाही विद्यार्थ्यांना लाभ होतो, तर महामंडळाला फायदा होतो. यामुळे सहलींसाठी जास्तीत जास्त एसटीला प्राधान्य दिले जाते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सहली झाल्या. या चार महिन्यात सहलींच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्हा गजबजून गेला होता. या माध्यमातून बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली. त्याप्रमाणे परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागालाही उत्पन्न मिळाले. कोल्हापूर विभागातील एकूण 12 आगाराच्या 1922 बसेस शैक्षणिक सहलींसाठी धावल्या. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आगाराच्या 310, संभाजीनगर 281 आणि कागल आगाराच्या 220 बसेस धावल्या. या शैक्षणिक सहलीतून कोल्हापूर विभागाला 7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- एसटीची सेवा सर्वसामान्यांना परवडणारी
गाव तिथे एसटी हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद आहे. एसटीची सेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळेच खासगी प्रवासी वाहतूकीचे आव्हान स्वीकारत एसटीची वाटचाल सुरु आहे. एसटीकडून प्रवाशांना सवलती दिल्या जातात. त्याप्रमाणे शैक्षणिक सहलींसाठी 50 टक्के सवलत आहे. यंदा कोल्हापूर विभागाला शैक्षणिक सहलीतून 7 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
संतोष बोगरे– विभागीय वाहतूक अधिकारी
- कोल्हापूर विभागास शैक्षणिक सहलीतून मिळालेले उत्पन्न
अ.क्र. आगार बस संख्या शाळेकडून मिळालेले उत्पन्न
1 कोल्हापूर 310 5202194
2 संभाजीनगर 281 4038568
3 इचलकरंजी 305 5212872
4 गडहिंग्लज 136 2348338
5 गारगोटी 129 2583314
6 मलकापूर 97 2262586
7 चंदगड 83 1563478
8 कुरुंदवाड 121 1986676
9 कागल 220 3983432
10 राधानगरी 133 3204725
11 गगनबावडा 34 647496
12 आजरा 73 1511974
1922 3,43,45,653
- शाळेकडून मिळणाऱ्या रक्कमेइतकीच शासनाकडे मागणी
शालेय सहलीसाठी एसटीच्या दरामध्ये 50 टक्के सवलत आहे. शाळेकडून जितकी रक्कम घेतली जाते तितकीच रक्कम शासनाकडे मागणी केली जाते.








