बेळगाव
पावसाचा जोर वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी दुपारी आदेश काढत मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरकारी व खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र यामध्ये निपाणी तालुक्याचा समावेश नव्हता. यासंदर्भात बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून निपाणी तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. नजीकच्या चिकोडी आणि हुक्केरी तालुक्याच्या तुलनेत निपाणी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंगळवारी निपाणी तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार रात्री उशिरा जिल्हाधिकारी रोशन यांनी पुन्हा स्वतंत्र आदेश काढत निपाणी तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.









