वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील शाळांना या वर्षापासून दिवाळीच्या दिवशी सुटी दिली जाण्याची शक्यता आहे. या शहराच्या महापौरांनी तशी घोषणा केली आहे. अद्याप या प्रस्तावावर न्यूयॉर्क प्रांताच्या गव्हर्नरांनी स्वाक्षरी केलेली नाही. तथापि, ही प्रक्रिया केवळ उपचार असून स्वाक्षरी लवकरच होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क शहरात भारतीय वंशाच्या नागरीकांची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये दुपटीहून अधिक वाढली आहे. दक्षिण आशिया खंडातील देशांच्या नागरीकांची संख्याही या शहरात वाढली आहे. हे लक्षात घेऊन दिवाळीच्या दिवशी सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
2 लाखांची संख्या
न्यूयॉर्क शहरात हिंदू, शीख, जैन आणि काही बौद्ध असे मिळून 2 लाखांहून अधिक नागरीक दरवर्षी दिवाळी साजरी करतात. तथापि, यावेळी शाळांना सुटी देण्यात येत नव्हती. त्यामुळे हिंदू किंवा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना दिवाळीचा आनंद पुरेशा प्रमाणात मिळवता येत नाही, असा मुद्दा काही जणांनी मांडला होता. भारतीय वंशाच्या नागरीकांची भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर एरिक अॅडॅम्स यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे.
यंदा दिवाळी रविवारी
यंदा अधिक महिन्यामुळे दिवाळीचा पहिला दिवस 12 नोव्हेंबरला असून त्या दिवशी रविवार आहे. रविवारी शाळांना सुटी असतेच. त्यामुळे यंदा विशेषत्वाने सुटी देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. पण यापुढे प्रत्येक वर्षी ही सुटी या शहरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ती दिवाळीच्या पहिल्या दिवसासाठी मिळणार आहे.
विधेयक संमत
न्यूयॉर्क प्रांताच्या विधीमंडळाने दिवाळीच्या सुटीच्या प्रस्तावाचे विधेयक बहुमताने संमत केले आहे. मात्र, अद्याप त्यावर गव्हर्नर कॅथी हॉचल यांनी स्वाक्षरी केलेली नाही. अॅडॅम्स यांच्याप्रमाणे त्याही डेमॉव्रेटिक पक्षाच्याच आहेत. विधिमंडळात याच पक्षाचे बहुमत आहे. पण लवकरच स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.









