प्रारंभोत्सवाचे आयोजन, तालुक्यातील शाळांत पाठ्यापुस्तकांचे वितरण : प्राथमिक 202 तर हायस्कूलसाठी 20 अतिथी शिक्षक
खानापूर : उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर बुधवार दि. 31 रोजी शाळेत विद्यार्थी दाखल होणार आहेत. यासाठी शैक्षणिक खात्याने तालुक्यातील सर्व शाळांमध्ये प्रारंभोत्सव करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सर्व शाळांत तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता सर्व शाळांत प्रारंभोत्सव करून पुष्पवृष्टी व पुच्छगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असून पाठ्यापुस्तकांचेही वाटप करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना गोड जेवणाचा आनंद घेता येणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून शाळांना उन्हाळी सुटी होती. गेल्या दोन दिवसापासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण खात्याने नियोजन केले असून दि. 29 व दि. 30 शाळा स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून सर्व शाळांतील वर्गखोल्या, स्वयंपाक, स्वच्छतागृहे, शाळेचे अंगण स्वच्छ करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानिमित्त सर्व शाळांत प्रारंभोत्सव करण्यात येणार आहे. याचेही नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात येणार आहे. तसेच शाळेचा परिसर रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांचे वितरण पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणात गोड देवून यावर्षीच्या माध्यान्ह आहाराची सुरुवात करण्यात येणार आहे.
तालुक्यातील प्राथमिक 413 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी 202 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर माध्यमिक 38 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यासाठी 20 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 1 जूनपासून या अतिथी शिक्षकांनी आपल्या सेवेत रुजू व्हावे, असा आदेश देण्यात आला आहे. माध्यमिक विद्यार्थ्यांना शालेय गणवेषाचे वाटप केले आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांना महिन्याभरात गणवेष व बुटांचे वितरण करण्याचे नियोजन आहे. तालुक्यातील सर्व शाळांची पाहणी केली असून ज्या शाळांची दुरुस्ती करायची आहे. त्याबाबतचे अहवाल वरिष्ठांकडे पाठविले आहे. दुर्गम भागातील कोणतीही शाळा शिक्षकाविना बंद पडणार नाही, याचे नियोजन केले असून या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यातील 19 शाळांत तात्पुरती बदली शिक्षक देऊन शाळा सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत, अशी माहिती तालुका शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांनी दिली.
नूतन आमदार शिक्षकांची कमतरता भरुन काढतील का?
खानापूर तालुक्याचे नूतन आमदार विठ्ठल हलगेकर हे स्वत: शिक्षक म्हणून सेवा बजावलेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षकाविना किती नुकसान होते, याची जाण त्यांना आहे. तालुक्यात अद्याप 200 शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर हे शिक्षक असल्याने आपण सरकार दरबारी याबाबत पाठपुरावा करून शिक्षकांची कमतरता भरुन काढतील, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे.









