शेतातून घरी परतताना घडली दुर्घटना
बेळगाव : वीज कोसळून शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी खणगाव बी. के., ता. बेळगाव येथे ही घटना घडली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्सा मेहबूब जमादार (वय 14) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. शाळेला सुटी असल्याने आई-वडिलांसमवेत ती शेताला गेली होती. शेतीची कामे आटोपून घरी परतताना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी अक्सासोबत तिची आईही होती. या घटनेसंबंधी माहिती देताना वडील मेहबूब जमादार म्हणाले, आपण बैलगाडीतून घरी येत होतो. अक्सालाही बैलगाडीत बसण्यास सांगितले. आपण आईसोबत चालत येणार असल्याचे सांगून पायवाटेने अक्सा येत होती. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वीज कोसळून आपल्या मुलीचा मृत्यू झाला. अक्साला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.









