दहावीचा शेवटचा पेपर सोडविण्याआधीच मनस्वीवर काळाचा घाला
कुडाळ –
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर ( 15, रा.निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा ( माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली.मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. मनस्वी हिचा 17 मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता.









