कोणाचे भाग्य केव्हा फळफळेल हे कोणालाही सांगता येणार नाही, अशी म्हण आहे. एकदा का ते उजळले, की आपल्या सर्व आर्थिक समस्या एका क्षणात सुटतात. चीनच्या वुहान येथे एका बालवाडीच्या एका शिक्षिकेला नुकताच हा अनुभव आला आहे. ही शिक्षिका गरीब परिवारातील आहे. घरच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठीं तिला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही ही नोकरी करावी लागली. पण तिला एक युक्ती सुचली आणि अगदी कमी वेळात ती करोडपती बनली. तिच्या सर्व आर्थिक समस्या चुटकीसरशी सुटल्या.
आपण शाळेत जे शिकवतो, त्याचा व्हिडीओ बनवून तो प्रसिद्ध केला तर आपल्याला मोठी लोकप्रियता मिळेल आणि पैसाही मिळेल, असे या शिक्षिकेला वाटले. प्रयोगासाठी तिने तसे करुन पाहिले. त्यात यश आल्यानंतर तिने हाच प्रयोग मोठ्या प्रमाणात करण्यास प्रारंभ केला. ती चांगली शिक्षिका असल्याने तिला चांगला प्रतिसाद मिळू लागला. अवघ्या दोन वर्षांमध्ये तिने इतके पैसे मिळविले की, ते ती संपूर्ण आयुष्यभर नोकरी करुनही मिळवू शकली नसती. आता तिने नोकरीचाही राजीनामा दिला आहे आणि हा ऑनलाईन शिकविण्याचा व्यवसाय ती पूर्णवेळ करत आहे. साहजिकच तिला आता बख्खळ पैसा मिळू लागला आहे.
आतापर्यंत तिने 2 कोटी 36 लाख रुपये मिळविले आहेत, असे तिचे म्हणणे आहे. तिच्या व्हिडीओजना 10 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता तिने एका टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीसह करारही केला असून हा व्यवसाय वाढविण्याचा तिचा विचार आहे. आतापर्यंतची तिची चीनी चलनातील कमाई 20 लाख युवान इतकी आहे. केवळ चीनमध्येच नव्हे, तर इतर देशांमध्ये राहणाऱ्या चीनी लोकांमध्येही तिचे व्हिडीओज प्रसिद्ध झाले आहेत, असे दिसून येत आहेत.









