खानापूर : तालुक्यातील मोहशेत ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या मांजरपायी, माचाळी, सतनाळी, पिंपळे आदी भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी लोंढा येथे यावे लागते. परंतु या भागातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ताच नसल्याने पावसाळ्यात धोकादायक कसरतीचा प्रकार करावा लागत आहे.
या ठिकाणी रेल्वे पुलाच्या खालून मार्ग असून सदर मार्गाच्या ब्रिज खाली पावसात पाणी भरते. त्यामुळे वाहत्या पाण्यातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी यावे लागत आहे. तसेच येथील ब्रिजवर कित्येक वर्षांपासून कठडे नसल्याने ब्रिजवरून पाणी वाहत असताना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.
यासंबंधी तक्रार करून देखील याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.