ब्राझिलिया / वृत्तसंस्था
ब्राझिलमधील दोन शाळांमध्ये बंदुकधाऱयाने केलेल्या हल्ल्यात दोन शिक्षक आणि एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. तसेच अन्य 11 जण जखमी झाले. हल्लेखोराचे वय सुमारे 16 वर्षे असून तो सेमी-ऑटोमॅटिक बंदूक घेऊन शाळेत घुसला. या हल्ल्यावेळी हल्लेखोराने बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते. एस्पिरिटो सँटो राज्यातील अरक्रूझ शहरात हा हल्ला झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर त्याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. एका शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाचे फुटेज समोर आले आहे. यामध्ये हल्लेखोर दिसत असून त्याने लष्करी गणवेश घातला आहे. तसेच चेहरा झाकण्यासाठी मास्कचा वापरही केला आहे. हल्लेखोराचे वडील पोलीस खात्यात असून आपल्या वडिलांच्या ताब्यातील बंदूक घेऊनच त्याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. तसेच हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहे.









